भवानीनगर (बारामती)- श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या 64 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये गदारोळ झाला. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली हा कारखाना चालत असून अजित पवारांमुळेच कारखान्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत, असा अजित पवार यांचे नाव घेऊन वैयक्तिकरित्या आरोप सभासदाने केल्याने सभेमध्ये गदारोळ झाला. यामुळे काही काळ कामकाज तहकूब झाले.
यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार हे छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक नाहीत व अध्यक्षही नाहीत व ते कोणत्या कमिटीवर ही नाहीत तरीदेखील त्यांच्यावर वैयक्तिक आरोप केला जात असल्याने सभेमध्ये उपस्थित असलेले पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकाळ व कारखान्याचे विद्यमान संचालक राजेंद्र गावडे यांनी असे वैयक्तिक आरोप खपवून घेतले जाणार नसल्याचे सांगितले. वैयक्तिक नाव घेऊन आरोप करणाऱ्यांनी माफी मागितली नाही तर सभा होऊ देणार नाही, असा पवित्रा घेतला. त्यामुळे काही काळ वातावरण चांगलेच तापले.
यावेळी सभेमध्ये उपस्थित असलेल्या सभासदांनी अजित दादा जिंदाबाद आशा घोषणा दिल्या. यावेळी विरोधकांनी प्रखर विरोध केला. शेवटी कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे व साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी सर्व सभासदांना शांत राहण्याचे आवाहन केले. त्यानंतर सभेतील सर्व सभासदांनी शांतता राखली व पुढील सभेचे कामकाज सुरू झाले. मात्र यामुळे श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यापुढील जो सभासदांच्या हिताचा विषय आहे तो मात्र बाजूलाच राहून एका वेगळ्याच वळणावर या सभेचे रूपांतर काही काळ झाले होते.