औंध(पुणे) – बाणेर गावासह येथील रस्ते दोन्ही बाजूने ऑक्टोबर 2019 मध्ये नो पार्किंग झोन करण्यात आल्याने व्यापारी, दुकानदार तसेच ग्राहकांसह स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत असून वाहने थांबवायची तरी कोठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसने सदर नो पार्किंग झोन उठविण्यात यावा, अशी मागणी पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
बाणेर येथील नो पार्किंग झोनचा मुद्दा आता तापू लागला आहे. याबाबत लोकप्रतिनिधींनी पुढाकार बाणेर बंद आंदोलनही केले होते. परंतु, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करीत अद्याप कारवाई सुरूच ठेवली आहे. बाणेर मुख्य रस्ता नो पार्किंग झोन करण्यापूर्वी वाहन पार्किंगसाठी पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे होते. परंतु, प्रशासनाकडून याबाबत कोणताही विचार करण्यात आला नाही.
दरम्यान, करोनाच्या आर्थिक संकटात असलेला व्यापारी तसेच सामान्य ग्राहक वाहनांवर होणाऱ्या पोलिसांच्या कारवाईने त्रस्त झाला आहे. याच मुद्यावरून पोलीस व सामान्य नागरिकांमध्ये वाद होत आहेत. बाणेर राष्ट्रवादी कॉंग्रेस तर्फे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे यासंदर्भात निवेदन देण्यात आले असून पुणे पोलीस, वाहतूक विभाग याना येथील नो पार्किंग झोन उठविण्याबाबत निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी कोथरुड विधानसभा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष नितीन कळमकर, विशाल विधाते, शेखर सायकर, अर्जुन ननावरे, महादेव चकणाकर, प्रणव कळमकर,ओमकार रणपिसे आणि रामदास धनकुडे उपस्थित होते