मोशी येथे करोना शिबिरात केली तपासणी
चिखली – करोना संसर्गाची लाट मार्च महिन्यात शहरात आली. तेव्हा करोना प्रादुर्भाव वाढू नये यासाठी महाराष्ट्रात व देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. अनलॉक झाल्यानंतर सर्व उद्योग, व्यवसाय हळूहळू सुरळीत होत असतानाच दिवाळीनंतर पुन्हा करोनाची लाट येणार असे तज्ज्ञांचे मत असल्याने पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील सर्व वाहतूक नियंत्रक पोलिसांची मोशी येथे सामाजिक कार्यकर्ते संतोष बारणे यांनी मोफत करोना तपासणी करून घेतली.
दिवाळीनंतर शहरात करोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे शासनाने करोनाबाबत घ्यावयाची काळजी व नियम नागरिकांनी पाळणे गरजेचे आहे. परंतु बहुतांश नागरिक नियमांचे पालन करताना दिसून येत नाहीत.
बाजारपेठांमध्ये गर्दी वाढत आहे. त्यामुळे करोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे शहरातील चौका चौकांत वाहतूक नियंत्रण करणाऱ्या पोलिसांचा अनेक बेशिस्त वाहनचालकांशी संपर्क येत आहे. त्यामुळे त्यांना करोनाचा संसर्ग होण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे अपत्तीपूर्व नियोजन करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संतोष बारणे यांनी सर्व वाहतूक पोलिसांची मोफत करोना चाचणी करून घेतली.