नगर परिषद प्रशासनाचा निर्णय : करोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात विलगीकरण कक्ष तयार
लोणावळा – करोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय पातळीवर अनेक कठोर निर्णय घेतले जात असताना, पर्यटन नगरी लोणावळा शहरातील सर्व पर्यटन स्थळे बंद करण्याचा निर्णय नगर परिषद प्रशासनाने घेतला आहे. 31 मार्चपर्यंत हा निर्णय कायम राहील, अशी माहिती लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव आणि मुख्याधिकारी सचिन पवार यांनी एका पत्रकार परिषदेद्वारे दिली.
लोणावळा नगर परिषदेच्या वतीने युद्धपातळीवर विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. नगर परिषद अधिकाऱ्यांच्या सलग बैठका सुरू आहेत. करोना संदर्भात शासन निर्णयानुसार उपाययोजना आखता येणे शक्य आहे त्यावर निर्णय या बैठकीत घेण्यात येत आहे. लोणावळा शहरात 20 खाटांचे एक विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले असून, जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे वैद्यकीय पथकाची मागणी करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी पवार यांनी दिली.
लोणावळा शहरात येणारी पर्यटकांची संख्या लक्षात घेता, करोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने वरील निर्णय घेतला आहे. याचवेळी शासकीय, निमशासकीय कार्यालय, रुग्णालये, पॅथालॉजी लॅबोरेटरी, दवाखाने, वैद्यकीय महाविद्यालय, औषधाची दुकाने, रेल्वे स्टेशन, एसटी स्टॅंड, रिक्षा थांबे, अंत्यविधी, अत्यावश्यक किराणा सामान, दूधविक्री केंद्र, फळे व भाजीपाला यांची दुकाने या जीवनावश्यक बाबींना परवानगी दिली आहे.
जनसंपर्क अधिकाऱ्याची नियुक्ती
करोना विषाणूबाबत मागील काही दिवसांपासून लोणावळा शहरात अनेक अफवा सोशल मीडियाद्वारे पसरत आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर लोणावळा नगर परिषदेच्या वतीने उपमुख्याधिकारी भगवान खाडे यांची जनसंपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कोणत्याही अफवांना बळी न पडता करोना विषाणू संदर्भात नगर परिषद करत असलेल्या उपाययोजनांची माहिती, सोशल मीडियावर शहराबाबत फिरणारी एखादी माहिती किंवा करोना संदर्भात शहरातील सद्यस्थिती कोणाला जाणून घ्यायची असेल, किंवा त्याबाबत काही अडचण असेल तर त्यांनी 9595550009 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.