सातारा – उसने पैसे मागितल्यामुळे शिवीगाळ, दमदाटी करून तसेच कुऱ्हाडीने वार करत खुनाच्या प्रयत्न केल्याप्रकरणी सोन्या उर्फ आकाश अविनाश मोरे (वय 23), अविनाश भैरू मोरे (वय 55), विश्वास भैरू मोरे (वय 61, सर्व रा. पंचशीलनगर, खेड- नांदगिरी, ता. कोरेगाव) यांना जिल्हा न्यायाधीश एन. एल. मोरे यांनी सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी प्रल्हाद बाजीराव मोरे (वय 60), सागर संपत मोरे (वय 31, दोघे रा. पंचशीलनगर) हे ता. 15 एप्रिल 2018 रोजी रात्री सव्वादहा वाजता सोन्या ऊर्फ आकाश मोरे यास उसने दिलेले पैसे मागण्यासाठी गेले होते. त्याचा राग मनात धरून तिघांनी संगनमताने सागर मोरे याच्या डोळ्यात मिरची पूड टाकली. अविनाश मोरे, विश्वास मोरे यांनी सागरला शिवीगाळ, दमदाटी करून हातातील लाकडी दांडक्याने मारहाण केली. यावेळी सोन्या मोरे याने सागर याचा खून करण्याच्या उद्देशाने कुऱ्हाडीने छातीवर एक व पाठीवर दोन वार करून त्याला गंभीर जखमी केले होते. याचा तपास तत्कालिन पोलिस उपनिरिक्षक डी. डी. चौगुले यांनी केला.
सहाय्यक जिल्हा सरकारी वकील एन. डी. मुके यांनी युक्तीवाद केले. त्यास पोलिस हवालदार धनंजय दळवी, पोलिस प्रॉसिक्युशन स्कॉडने खटल्यात मदत केली. न्या. मोरे यांनी सोन्या ऊर्फ आकाश मोरे याला तीन वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड, दंड न दिल्यास तीन महिने साधी कैद अशी, तर अविनाश मोरे, विश्वास मोरे यांना दोन महिने सक्तमजुरी व प्रत्येकी 500 रुपये दंड, दंड न भरल्यास आठ दिवस साधी कैद अशी शिक्षा सुनावली.
रविवारी विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. महाराष्ट्र विकास आघाडीचे संख्याबळ पाहता अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होईल, असे बोलले जात होते. मात्र, भाजपनेही अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेत चुरस निर्माण केली आहे. अध्यक्ष पदासाठी आघाडीच्या वतीने कॉंग्रेसचे नाना पटोले यांनी तर भाजपाकडून ज्येष्ठ आमदार किसन कथोरे यांनी आज अर्ज भरला आहे. रविवारी सकाळी 11 वाजता अध्यक्षांची निवड होणार असून रविवारी सकाळी 10 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. भाजपने अध्यक्षपदाची निवडीसाठी गुप्तपद्धतीने मतदान घेण्याची मागणी केली आहे. दरम्यान, सकाळी अध्यक्षांची निवड झाल्यानंतर विरोधी पक्षनेत्यांच्या नावाची घोषणा केली जाणार आहे. त्यानंतर सायंकाळी 4 वाजता राज्यपालांचे अभिभाषणानंतर पुन्हा सभागृहाचे कामकाज सुरु होणार आहे.