बेंगलुरू :- कर्नाटकात मे महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. राज्यात सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आधीच सक्रिय आहे, दरम्यान अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने कर्नाटकात एन्ट्री केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे संयोजक केजरीवाल यांनी शनिवारी कर्नाटकात निवडणुकीचा बिगुल वाजवला आहे.
शनिवारी आपल्या पहिल्या जाहीर सभेला संबोधित करताना अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. भाजप सरकारवर अनेक आरोप करत त्यांनी पाच वर्षे भ्रष्टाचारमुक्त सरकार देण्यासाठी आम आदमी पक्षाला संधी देण्याचे आवाहन केले.
भाजप सरकारवर हल्लाबोल करताना केजरीवाल म्हणाले, राज्यात 40 टक्के कमिशनचे सरकार सुरू आहे. त्यांनी चन्नागिरीचे भाजप आमदार मादल विरुपक्षप्पा यांचा मुलगा प्रशांत कुमार एमव्ही याच्याकडून 8.23 कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड वसूली प्रकरणाचा मुद्दा लावून धरला. आम आदमी पक्षामध्ये भ्रष्टाचाराबाबत शून्य सहिष्णुता आहे, पंजाबचे उदाहरण देत ते म्हणाले, आप शासित पंजाबमध्ये भ्रष्टाचारासाठी मंत्री आणि आमदाराला तुरुंगात टाकण्यात आले. यावेळी केजरीवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही निशाणा साधला.
Thane : जितेंद्र आव्हाडांना दिलासा, ‘त्या’ प्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर
केजरीवाल म्हणाले की, जे स्वत:ला ‘डबल इंजिन सरकार’ म्हणवतात, त्याठिकाणी भ्रष्टाचार दुपटीने वाढतो. म्हणूनच याठिकाणी नवीन इंजिन सरकारची आवश्यकता आहे. “आम्ही कट्टर प्रामाणिक आहोत. आम्ही भ्रष्टाचारमुक्त सरकार देऊ. आम्ही मोफत वीज देऊ, चांगल्या सरकारी शाळा बनवू आणि दर्जेदार शिक्षण देऊ,” असे देखील केजरीवाल म्हणाले.