पिंपरी – “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेल्या वंचित आणि ओबीसींनी निर्णय प्रक्रियेत येण्यासाठी आपले प्रतिनिधी सभागृहात पाठवले पाहिजेत. वंचितांचे, शोषितांचे खरे परिवर्तन घडविण्यासाठी वंचित बहुजन आघाडी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व जागा लढविणार,” अशी घोषणा वंचित बहुजन आघाडीच्या प्रभारी प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी केली.
वंचित बहुजन आघाडीची पिंपरी चिंचवड शहर जिल्हा समीक्षा व संवाद बैठक शुक्रवारी (दि. 24) काळेवाडी येथे आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष गोविंद दळवी, सर्वजित बनसोडे, अनिल जाधव, महिला आघाडी उपाध्यक्षा सविता मुंढे, पश्चिम महाराष्ट्र समीक्षा बैठकचे समन्वयक चंद्रकांत खंडाईत, शहराध्यक्ष देवेंद्र तायडे, महिला शहराध्यक्षा लता रोकडे आदी उपस्थित होते.
ठाकूर म्हणाल्या की, घटनेने “एक मत-एक मूल्य’ अधिकार दिला असतानाही सार्वत्रिक निवडणुकांमध्ये प्रभाग पद्धत सुरू केली. वंचितांना सत्तेपासून दूर ठेवण्याचे हे कुटील राजकारण आहे. ओबीसींचा इम्पिरीकल डेटा सर्वोच्च न्यायलयात देता येत नाही, कारण त्यातील माहिती पूर्ण नाही. असे कालच मोदी सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले. केंद्र सरकार जनगणनेत जमा केलेला डेटा देत नाही, असे सांगते. राज्यात भाजपचे पदाधिकारी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सांगतात की, ओबीसींचा डेटा देणे राज्य सरकारचे काम आहे.
ओबीसींना गेल्या पन्नास वर्षांपासून आरक्षणापासून वंचित ठेवले जाते आहे. जो पक्ष राष्ट्रीय जनगणनेत ओबीसींची स्वतंत्र नोंद करेल, त्यांनाच मते देण्याचा निर्धार त्यांनी करावा.
चंद्रकांत खंडाईत यांनी प्रास्ताविक केले. शहराध्यक्ष देवेंद्र तायडे यांनी स्वागत केले.