स्टॉकहोम – जगातील बहुतांशी लोक लॉकडाऊनमध्ये आहेत. मात्र स्वीडनचे नागरिक यापासून मुक्त आहेत. येथे बार, रेस्टॉरंट, शाळा सर्व सुरु आहेत. लोक एकत्र येण्यावरही बंदी नाही. सरकारने लोकांना सांगितले आहे की, जास्तीत जास्त काम घरुन करा, 70 वर्षांवरील लोकांनी घरीच थांबावे, मात्र यातले काहीही अधिकृत नाही.
स्वीडनमध्ये 16 मार्चला कोरोना संसर्गाचे पहिले प्रकरण समोर आले होते. तेव्हापासून आतापर्यंत संसर्गाची पाच हजार प्रकरणे समोर आली होती. यातील 188 जणांचा मृत्यू झाला.डेन्मार्क, फिनलंड आणि नॉर्वेमध्ये पूर्णपणे लॉकडाऊनची स्थिती आहे, तर शेजारच्या स्वीडनमध्ये केवळ महाविद्यालये बंद आहेत. इंग्लंडमध्ये दोन जणांना एकत्र, एका ठिकाणी उभे राहण्याची मनाई आहे, तर स्वीडनमध्ये सरकारने 50 जणांना एका ठिकाणी गोळा व्हायची परवानगी दिली आहे. येथील रस्त्यांवर पहिल्याप्रमाणेच गर्दी आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळले जात असल्याचे कोणतेही संकेत नाहीत. रस्त्यावरील खाद्यपदार्थांची दुकाने अजूनही सुरू आहेत. मात्र स्वीडन सरकारने रेस्टॉरंट आणि बारमध्ये टेबलवर सर्व्ह करण्याचे निर्देश दिले आहेत. 16 वर्षांपेक्षा कमी वयाची मुले रोज शाळेत जात आहेत.
सरकार विनाशाकडे नेत आहे…
स्वीडन सरकारच्या बेपर्वा कारभारावर दोन हजार स्वीडिश संशोधकांनी पत्र लिहिले आहे. व्हायरॉलॉजीचे एक प्राध्यापक सांगतात, जास्त तपासण्या केलेल्या नाहीत, संसर्ग झालेल्यांचा मार्गही काढला जात नाही आणि आयसोलेशनही पुरेसे करण्यात आलेले नाही. हे आम्हाला विनाशाकडे नेत आहे. तसेच उमिया विद्यापीठाचे अभ्यासक सांगतात की, आम्ही स्टॉकहोममध्ये अद्याप कोणालाही क्वॉरंटाइन असल्याचे पाहिलेले नाही. आमचा जगातील एकमेव देश असेल जेथे काहीच केले जात नाही. गेल्या आठवड्यात जेव्हा पंतप्रधान स्टेफन लॉफवन टीव्हीवर संबोधित करायला आले तेव्हा लोकांना वाटले की मुलांच्या शाळा बंद केल्या जातील. मात्र अशी कोणतीही घोषणा केली गेलेली नाही.