शहर, उपनगरांतील सर्वच रस्त्यांची दुरवस्था

पॅचिंगचे काम सुरू, मात्र खड्डे बुजविताना मोठी खडी वर आल्याने अपघातास निमंत्रण
नगर  (प्रतिनिधी) – शहरातील खड्डे बुजविण्याचे काम महापालिकेने हाती घेतले असून अप्पू हत्तीचौक, लालटाकी रस्त्यासह उपनगरातील सावेडी परीसर, बालिकाश्रम रस्ता आणि इतर भागातील खड्डे बुजविण्याचे काम सुरू आले आहे. मात्र, या रस्त्यातील खड्डे बुजविण्याकरीता मोठ्या आकाराची खडी वापरली आहे. त्यावर अर्धा इंची आकाराची खडी पसरली आहे. मात्र आता अर्धा इंची खडी बाजूला होवून मोठीमोठी दगडंवर आली असल्याने त्यावरून वाहने चालविणे जिकीरीचे होत असून अपघात होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे संबंधित विभागाने रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

शहरातील सर्वच रस्त्यांची गेल्या पावसाळ्यात दूरवस्था झाली. त्यानंतर मनपाकडे नागरिकांनी रस्त्याचे पॅचिंग करावे अशी मागणी केल्यानंतर महिनाभरानंतर हे काम सुरू करण्यात आले. त्यानंतर पुन्हा ही कामे बंद पडली. तब्बल तीन महिन्यांनंतर पॅचिंगचे काम सुरू झाल्याने आणि ती उघडी पडल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे. पसरलेल्या खडीवरून गाड्या घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. दिवसागणिक दोन ते तीन दुचाक्‍यांचा अपघात हमखास होतो. तर कधी मोठी वाहने गेल्यानंतर टायर खालील दगड उडून लागल्याचीही अनेक उदाहरणे आहेत.

एकीकडे रस्त्यावरील खड्ड्यांचे प्रमाण वाढलेले आहे तर दुसरीकडे खडीवर आल्याने वाहने नीटशी चालविता येत नाही, अशी नगरकरांची इकडे आड आणि तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे. शिवाय या रस्त्यांवरून ये-जा करताना धूळीचा त्रास होतो तो निराळाच. या धुळी मुळेही अनेकांना श्‍वसनाचे विकार जडण्यास सुरुवात झाली आहे. मनपाने रस्ते पॅचिंगचे काम तातडीने पूर्ण करावे अशी नागरिकांची मागणी आहे. त्यामुळे दुचाकी स्वार व पादचाऱ्यांना जा-ये करण्यास अडथळा निर्माण होणार नाही.

मनपाने खड्डे पॅचिंगचे काम सुरू केले आहे. त्यात मोठ्या आकाराची खडी टाकून ते बुजविण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र पॅचिंगचे हे काम अर्धवट असून बारीक खडीमिश्रीत डांबर टाकण्याचे काम अजून बाकी आहे खडी आणि डांबर मिश्रित थर दिला जाणार आहे. तसेच ह्या खड्ड्यांना एकदीड वर्ष खराब होणार नाही यासाठी चांगल्या पद्धतीने करण्यात येणार आहे.
सुरेश इथापे ,प्रभारी शहर अभियंता महापालिका

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.