बारामती (प्रतिनिधी) – बारामती शहरातील उपचार घेत असलेला शेवटचा कोरोना संक्रमित रुग्ण कोरोना मुक्त झाला आहे. पुणे येथील ससुन रुग्णालयातून त्याला घरी सोडण्यात आले. त्यामुळे बारामती शहर सध्या कोरोना मुक्त शहर झाले आहे.
‘कोरोनामुक्त बारामती’चं सर्व श्रेय हे डॉक्टर, नर्स, पोलीस, सफाई कर्मचारी, महसूल विभाग, नगर परिषद,सर्व नगरसेवक,ग्राम प्रशासन व पदाधिकारी यांना जातं.अनेक सामाजिक संस्थांनी देखील या लढाईत हातभार लावला. तमाम बारामतीकरांनी ‘लॉकडाऊन’चे सर्व नियम काटेकोरपणे पाळल्यानं हे शक्य झालं आहे.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) April 30, 2020
बारामती शहर व तालुक्यात एकूण आठ रुग्ण कोरोना संक्रमित आढळले. त्यामध्ये समर्थ नगर व माळेगाव येथील रुग्णाचा मृत्यू झाला. शहरातील पहिला कोरणा संक्रमित रिक्षाचालक रुग्ण यापूर्वी कोरूना मुक्त झाला आहे, त्यानंतर समर्थ नगर येथील एकाच कुटुंबातील चौघेजण कोरोना मुक्त झाले. या कुटुंबातील एक वर्षाच्या चिमुरडीने देखील कोरोनावर मात केली. त्यानंतर आज म्हाडा कॉलनीतील वयोवृद्ध व्यक्ती कोरोनामुक्त झाल्याने बारामती शहरात सध्या कोरोना संक्रमित एकही रुग्ण नाही. त्यामुळे सध्या बारामती शहर कोरोना मुक्त शहर झाले आहे.
बारामती शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार शहरात सुरुवातीला भिलवाडा पॅटर्न अवलंबण्यात आला. बारामती शहर व तालुका सीलबंद करण्यात आले. त्यामुळे शहरातील वाहतूक नियंत्रित झाली. कोणीही घराबाहेर पडू नये प्रशासनाच्यावतीने केलेल्या सूचनांचे पालन बारामतीकरांनी केले. त्यानंतर शहरात बारामती पॅटर्न राबविण्यात आला.
बारामती पॅटर्न नुसार लॉक डाऊन अधिक कडक करण्यात आले. बारामतीतील नागरिकांना शेतकरी बचत गट तसेच ठराविक शेतकऱ्यांच्या माध्यमातून घरपोच पालेभाज्या देण्यात आल्या. शहरातील दुकानदार व्यापाऱ्यांच्या माध्यमातून घरपोच किराणा देखील दिला याकामी स्वयंसेवकांची देखील मदत घेण्यात आली. शहरातील 44 वार्ड मध्ये हा उपक्रम राबवण्यात आला. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कोणत्याही कारणासाठी घराबाहेर पडणे बारामतीकरांनी टाळले. त्यामुळे प्रशासनाच्या साथीने कोरोनाची साखळी तोडण्यात बारामतीकर सध्यातरी यशस्वी झाले आहेत.
असले तरीदेखील बाहेर ठिकाणी कोरोनचा वाढता प्रादुर्भाव धोकादायक आहे, त्यामुळे अजून काही दिवस शहरात भीलवाडा तसेच बारामती पॅटर्न सुरूच राहणार असून नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
असा घडला घटनाक्रम….
- 29 मार्च रोजी श्रीराम नगर येथील रिक्षाचालक पहिला कोरोना संक्रमित आढळला.
- 6 एप्रिल रोजी समर्थ नगर येथील भाजीविक्रेता दुसरा कोरोना संक्रमित आढळला.
- 7 एप्रिल रोजी भाजी विक्रेत्याच्या तकुटुंबातील चौघे कोरोना संक्रमित आढळले.
- 9 एप्रिल रोजी कोरोना संक्रमित भाजीविक्रेतेचा मृत्यू.
- 14 एप्रिल रोजी म्हाडा कॉलनीतील 77 वर्षीय व्यक्ती कोरोना संक्रमित आढळली.
- 24 एप्रिल रोजी तालुक्यातील माळेगाव येथील एकास कोरोनाची बाधा.
- 25 एप्रिल रोजी माळेगाव येथील कोरोना संक्रमित रुग्णाचा मृत्यू.