शिरूर -शिरूर येथील बालाजी इंग्लिश मीडियम स्कूल (सीबीएसइ बोर्ड), बालाजी विश्व विद्यालय (स्टेट बोर्ड) व सर्व प्रि- प्रायमरीमधील सर्व शिक्षकांनी ऑनलाइन वर्ग सुरू केले आहेत. करोनाच्या अनपेक्षित सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर सर्व शाळा बंद आहेत. मुलांचे नुकसान होऊ नये म्हणून बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्वच शाळांमधील शिक्षकांनी प्रथम एक मीटिंग घेऊन ऑनलाइन वर्गांचे नियोजन केले.
ऑनलाइन वर्ग सर्वप्रथम दहावीपासून सुरू केले. सर्व वर्गांसाठी ऑनलाइन उपक्रमाचे नियोजन केले आहे. वर्गनिहाय प्रत्येक शिक्षकांनी आपापल्या वर्गाचा व्हॉट्सऍप ग्रुप केला आहे. सर्व शिक्षकांनी पुढील 30 दिवसांच्या अभ्यासाचे लिखित नियोजन केले आहे.
दि. 18 मार्चपासूनच ऑनलाइन वर्ग नियोजनाप्रमाणे सुरू झाले. व्हिडीओ, ऑडिओद्वारे शिकविण्यासाठी गुगल, झूम ऍपचा वापर करीत आहेत. त्यामुळे मुलांचा अभ्यास नियमित सुरू आहे. लॉकडाऊनमध्ये घरी सुरक्षित राहून शिक्षणात खंड पडू न देणारा व शिक्षणास उपयुक्त असा शैक्षणिक उपक्रम असल्याचे मत प्राचार्य व सर्व संचालक मंडळ यांनी व्यक्त केले.
काळानुरूप असे विद्यार्थीहिताचे उपक्रम राबवणे गरजेचे असल्याचे मत संस्थेचे अध्यक्ष सदाशिव पवार यांनी व्यक्त केले. हा उपक्रम राबविण्यासाठी संस्थेचे चेअरमन सदाशिव पवार, ऍकॅडेमिक डायरेक्टर प्रियदर्शिनी सरदेसाई, एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर रोशनी डिसुझा, मुख्याध्यापक जॉन वर्गीस, स्वाती चतर यांचे मार्गदर्शन लाभले.