शिरूर : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कवठे येमाई हे कलावंताच गाव आहे. बी. के. मोमीन, तमाशा चालक व कलावंत गंगारामबुवा रेनके कवठेकर, विठ्ठल कवठेकर, कवी चंदुलाल, दत्तोबा कवठेकर यांनी गाणी रचून तमाशा पंढरी महाराष्ट्रभर चालवली. मोहन पडवळ हा चित्रपटासाठी लेखन करत असून आता त्याच गावातील हरहुन्नरी कलाकार, अभिनेता सचिन अर्जुन शिंदे हे लवकरच ‘तुझं वेड लागलं ‘ या मराठी चित्रपटात विशेष सह कलाकार म्हणून भूमिका साकारताना पाहावयास मिळणार आहेत.
तशा आशयाचे शीतल फिल्म्स प्रॉडक्शन, मुंबई यांचे पत्र नुकतेच त्यांना प्राप्त झाल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मराठी चित्रपटात भूमिका साकारण्यासाठी सचिन शिंदे या हुरहुन्नरी कलाकाराची प्रथमच निवड झाल्याने कवठे येमाईत त्यांच्या चाहत्यामधून व तरुण वर्गात जल्लोष साजरा होत आहे. अत्यंत जेमतेम परिस्थितीत शिक्षण घेतलेले सचिन शिंदे यांना अगदी लहानपणापासूनच छोटे मोठे अभिनय, फोटोग्राफी, भूमिका, उत्कृष्ठ निवेदक म्हणून काम करण्याची आवड असल्याने ते सर्वांमध्ये लोकप्रिय आहेत.
त्यांनी अनेक छोट्या मोठ्या पटकथांमध्ये ही सर्वांग सुंदर अभिनयाच्या भूमिका यशस्वीपणे साकारताना रसिक प्रेक्षकांची मने जिकंलेली आहेत. गरीब मुलांनी ही शाळा शिकावी म्हणून त्यांनी त्यांच्या वस्तीवर सायकलवर जाऊन समाजप्रभोधनरुपी शिक्षकाची साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडून गेली आहे.
आपल्याकडे असलेल्या कला अविष्कारावर नितांत प्रेम करीत जोपासना करणारे ग्रामीण कलाकार सचिन शिंदे यांची आता चित्रपटात काम करण्यासाठी निवड झाल्याने त्यांनी घेतलेल्या अखंड मेहनतीस त्यांना फळ मिळाल्याचे चित्र दिसत आहे. त्यांचा मित्रवर्ग व ग्रामस्थांनी अभिनंदन करीत त्यांना आगामी चित्रपटातील अभिनयासाठी शुभेच्छा दिल्या.