दिल्लीतले सगळे रस्ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनवणार- केजरीवाल

नऊ रस्त्यांचा पायलट प्रोजेक्ट सुरू

नवी दिल्ली: दिल्ली सरकारने आपल्या हद्दीतील सर्वच रस्ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनवण्याचा निर्णय घेतला असून प्रत्येक रस्त्याचे आज रिडिझायनींग सुरू करण्यात आले आहे. त्यातील नऊ रस्त्यांचा पहिला पायलट प्रोजेक्ट हाती घेण्यात आला आहे अशी माहिती त्या राज्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

ते म्हणाले की दिल्ली सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत एकूण 1260 किमीचे रस्ते येत आहेत. या सर्व रस्त्यांची फेर आखणी केली जात आहे. त्याद्वारे वाहतूक कोंडीच्या प्रश्‍नावरही उकल साधली जाईल असे ते म्हणाले. पायलट प्रकल्पात 45 किमी अंतराचे जे नऊ रस्ते नव्याने आखले जाणार आहेत त्याचे काम येत्या वर्षभरात पुर्ण होईल असे ते म्हणाले. या कामासाठी चारशे कोटी रूपये खर्च केले जाणार आहेत. फुटपाथही मोठे केले जाणार असून या रस्त्यांवर अपंगांसाठीही स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे. या रस्त्यांवर रिक्षा आणि ई रिक्षांसाठी स्वतंत्र थांबे दिले जाणार असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेलाही यात प्राधान्य दिले जाईल असे ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.