वर्धा : वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे कामावर जाणाऱ्या प्राध्यापक तरुणीला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणाविरोधात हिंगणघाटमध्ये मंगळवारी सर्वपक्षीय बंद पुकारण्यात आला आहे. एकतर्फी प्रेमातून आरोपीने पीडित तरुणीला जिवंत जाळले होते. पीडित तरुणीवर उपचार सुरु असून तिची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला नागपूर जिल्ह्यातून अटक केली.
पीडित तरुणी महाविद्यालयामध्ये प्राध्यापक आहे. सोमवारी ती कामासाठी निघाली. हिंगणघाटच्या नंदोरी चौकामध्ये ती बसमधून उतरली. त्याठिकाणावरुन ती महाविद्यालयाकडे चालत जात होती. त्याच दरम्यान आरोपी दुचाकीवरुन मित्रासोबत आला. त्याने दुचाकीमधून एका प्लास्टिकच्या बाटलीमध्ये पेट्रोल काढले आणि तरुणीच्या अंगावर टाकून तिला पेटवून दिले. या घटनेमध्ये पीडित तरुणी गंभीर जखमी झाली. तिच्यावर सध्या नागपूरच्या ऑरेंजसिटी रुग्णालयात उपचार सुरु आहे.
याप्रकरणी पोलिसांनी विकेश उर्फ विक्की नगराळे याला नागपूर येथून अटक केली. विक्की पीडित तरुणीवर एकतर्फी प्रेम करतो. त्याचे लग्न झालेले असून तो पीडित तरुणी ज्या गावात राहते त्याच गावात राहतो. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आणि सर्वपक्षियांनी आज हिंगणघाट बंदची हाक दिली आहे. दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हा घटनेची निंदा केली असून पोलिस अधिक्षकांना चौकशीचे आदेश दिले आहेत.