पर्यटकांसमोर थाळी मांडून व्यावसायिकांचे भीक मागो आंदोलन
खडकवासला : प्रशासक, राज्यसरकार व वनविभागाच्या कारभाराच्या विरोधात संताप व्यक्त करत किल्ले सिंहगडावरील हॉटेल व्यवसायिकांसह सर्वपक्षीय नेत्यांनी भीक मांगो आंदोलन केले.
गेली 50 वर्षांहून अधिक काळ सिंहगड किल्ल्यावर व्यवसाय करणाऱ्या स्थानिकांची हॉटेल चार दिवसांपूर्वी जमीनदोस्त करण्यात आली. यामुळे किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांवर उदरनिर्वाह अवलंबून असलेल्या स्थानिक नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या गोष्टीचा निषेध म्हणून रविवारी (दि. 20) सिंहगड किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांसमोर थाळी पसरवून हे भीक मागो आंदोलन करून प्रशासन व सरकारच्या या बेजवाबदार कृत्याच्या विरोधात नागरिकांनी नेत्यासह आपला निषेध नोंदवला.
आज झालेले हे आंदोलन तात्पुरत्या स्वरूपाचे नसून भविष्यात हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी स्थानिक नेत्यांनी, नागरिकांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन हवेली पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांना देण्यात आले आहे. यावेळी सर्व स्थानिक, हॉटेल व्यवसायिक, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नवनाथ पारगे, शिवसेना तालुकाप्रमुख गणपत खाटपे, संतोष शेलार, पंचायत समितीचे माजी सदस्य अनिरुद्ध यादव, नितीन वाघ, मनसेचे विजय मते, डोणजे गावचे माजी उपसरपंच बाळासाहेब पायगुडे, मारुती कंक, खडकवासलाचे माजी सरपंच संदीप मते, शंकर चव्हाण, संघदीप शेलार, महेश पारगे आदी उपस्थित होते.
वनविभागाने अगोदर स्थानिक व्यावसायिकांची पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक होते. अचानक कारवाई करण्यात आल्याने गडावर पर्यटकांची गैरसोय झाली आहे. याबाबत उपवनसंरक्षक राहुल पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे.
– विजय मते, अध्यक्ष खडकवासला मतदारसंघ मनसे
सिंहगड किल्ल्यावरील संबंधित अधिकारी, वन प्रशासनाने केलेली कारवाई हुकुमशाही पद्धतीने झाली आहे. काहीही झाले तरी स्थानिक व्यावसायिकांवर अन्याय होऊ देणार नाही.
– नवनाथ पारगे, माजी सदस्य, जिल्हा परिषद पुणे
सिंहगडावरील झालेली अतिक्रमण कारवाई कष्ट करून घर चालवणाऱ्यांवर केली गेली आहे. वनविभागाने या व्यवसायिकांना न्याय देण्याची गरज आहे.
– नितीन वाघ, माजी सदस्य जिल्हा परिषद
सिंहगडावरील कारवाई विरोधात सर्व व्यवसायिक आक्रमक झाले आहेत. त्यांच्यावरच वनविभाग अन्याय करीत आहे. या संदर्भात आमदार व पालकमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे.
– अनिरुद्ध यादव, माजी सदस्य पंचायत समिती