संपुर्ण पाकिस्तान अंधारात: जागतिक स्तरावर इम्रान खान सरकारची नाचक्‍की

पॉवर सिस्टम फेल झाल्यामुळे पॉवर ब्लॅकआऊट

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये काल रात्री अचानक वीज गेल्याने अख्या देशात अंधार झाल्याचे पाहायला मिळाले आहे. संपूर्ण पाकिस्तानमध्ये पॉवर सिस्टम फेल झाल्यामुळे पाकिस्तानात बत्ती गुल झाली होती. पाकिस्तानमधील कोणतेही असे शहर नाही किंवा चौक नाही, जिथे वीज असल्याचे पाहायला मिळाले नाही. दरम्यान, वीज गेल्यानंतर बराच काळ लोटल्यानंतरही अनेक भागांत अद्याप वीज परत आलेली नाही.

संपूर्ण पाकिस्तानात वीज गेल्याचे वृत्त वाऱ्यासारखे जगभरात पसरले, त्यानंतर ट्‌विटरवर #blackout हॅशटॅग ट्रेंड करु लागला. कोणी या घटनेला भारतीय वायू सेनेने केलेला हल्ला म्हणत होतं तर कोणी याला सायबर अटॅक म्हणत होते. यादरम्यान पाकिस्तानी टीव्ही चॅनल्सवरही पॉवर ब्लॅकआउटचं वृत्त प्रसारित होऊ लागलं. असं सांगण्यात येत आहे की, पाकिस्तानमधील सर्वच मोठ्या शहरांमध्ये म्हणजेच, कराची, इस्लामाबाद, लाहौर, पेशावर, रावलपिंडी याठिकाणीही पॉवर ब्लॅकआउट झालं आहे. यासर्व गोंधळादरम्यान, पाकिस्तानच्या ऊर्जा मंत्र्यांनी ट्‌विटरवर एक ट्‌वीट केलं आहे.

ऊर्जा मंत्र्यांनी ट्‌वीटमध्ये म्हटले की, “रात्री 11 वाजून 41 मिनिटांनी पॉवर ट्रान्समिशन सिस्टमची फ्रिक्वेंसी अचानक 50 ते 0 ने खाली आल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे संपूर्ण देशात ब्लॅकआऊट झाले आहे. यामागील कारण शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी संयम राखावा.”

पाकिस्तानचे सूचना मंत्री शिबली फराज यांनीही पॉवर ब्लॅकआउट बाबत आपले वृत्त प्रसारित केले आहे. ते म्हणाले की, एनटीडीसीच्या सिस्टिममध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. सिस्टिम रिस्टोअर करण्याचे काम सुरु आहे. त्यानंतर काही वेळाने ऊर्जा मंत्रालयाच्या ट्‌विटर अकाउंटवरुन नॅशनल पॉवर कंट्रोल सेंटरमध्ये वीज पुरवठा सुरळीत करण्याचं काम सुरु असून ऊर्जामंत्री त्याची पाहणी करतानाचा एक फोटोही शेअर करण्यात आला. त्यानंतर जवळपास 1.45 वाजता एनटीडीसीच्या संगजनी आणि मर्दन ग्रिडमध्ये वीज पुरवठा सुरळीत झाला असल्याची सूचना देण्यात आली. त्यानंतर शाही बाग ग्रिड आणि बहरिया टाउनमध्येही वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला.

सकाळी इस्लामाबाद इलेक्‍ट्रिक सप्लाई कंपनीच्या ग्रीडची वीज सुरु करण्यात आली. दरम्यान, पॉवर ब्लॅकआऊटला अनेक तास उलटल्यानंतरही जवळपास अर्ध्या पाकिस्तानात वीज अद्यापही गायब आहे. पाकिस्तानात वीज गायब होण्याची गोष्टी काही नवी नाही. याआधी 2018मध्ये दोनवेळा पाकिस्तानात पॉवर ब्लॅकआऊट झाला होता. 2015मध्ये जेव्हा बलूच आंदोलकांनी पॉवर ग्रीडवर हल्ला केला होता, त्यावेळीही पाकिस्तानमध्ये पॉवर ब्लॅकआऊट झाला होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.