निर्णायक लढाईसाठी सर्व पर्यायांचा अवलंब – अर्थमंत्री अरुण जेटली यांचे प्रतिपादन

नवी दिल्ली – पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याला जबाबदार असलेल्या पाकिस्तानविरोधात निर्णायक लढाई जिंकण्यासाठी मुत्सदेगिरीसह सर्व पर्यायांचा समर्थपणे अवलंब भारत करेल, अशी ग्वाही अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली. पुलवामा हल्ल्यातील दोषींनी स्वतःच हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. तरीही त्या दोषींवर कारवाई न करणारा पाकिस्तान एक “दुष्ट’ देश आहे, असे जेटली म्हणाले.

पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळणे अवघडच…
पाकिस्तानबरोबर क्रिकेट सामने खेळण्यासंदर्भात सध्याचे वातावरण खूप अस्थिर आहे. त्यामुळे पाकिस्तानबरोबर मित्रत्वाने किंवा स्पर्धांमधूनही क्रिकेट खेळता येऊ शकणार नाही. या संदर्भात नागरिकांच्या भावना समजल्या जाऊ शकतात. विश्‍वचषक स्पर्धेमध्ये पाकिस्तानविरोधात सामना खेळण्याबाबतचा निर्णय भारतीय क्रिकेट संघाच्या व्यवस्थापन समितीकडून लवकरच घेतला जाईल, असे जेटली यांनी सांगितले. दहशतवादाशी संबंध असलेल्या कोणत्याही देशाबरोबरचे संबंध तोडून टाकायचा आग्रह “आयसीसी’कडे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. विश्‍वचषक स्पर्धेमध्ये 16 जूनरोजी भारत आणि पाकिस्तानदरम्यान इंग्लंडमध्ये ट्राफोर्ड इथे सामना खेळला जाणार आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी कृती करण्यायोग्य गोपनीय माहितीची मागणी केली आहे. पण जर दोषी माहिती नसतील तर अशी गोपनीय माहिती मागितली जाऊ शकते. पाकिस्तानमध्ये बसलेल्या व्यक्‍तीकडून कबुली दिली जात असेल, तर त्यासाठी गोपनीय माहितीची काय गरज, असे जेटली म्हणाले. पाकिस्तानकडून भस्मासूर पोसला जात आहे, अशी टीकाही त्यांनी केली. “ग्लोबल बिजनेस समिट’मध्ये ते बोलत होते.

आपण आतापर्यंत युद्ध, मानवी दुर्घटना आणि दहशतवाद्यांकडून पंतप्रधानांची झालेली हत्याही बघितल्या. मात्र पुलवामाच्या घटनेनंतर निर्माण झालेला संताप अभूतपूर्व आहे. पाकिस्तानविरोधातील युद्धात निर्णायक विजय मिळवण्यासाठी सर्व पर्याय खुले असल्याचे पंतप्रधानांनीही सांगितले आहे. हे युद्ध एका आठवड्यापुरते नाही. वेगवेगळ्या स्वरुपात हे युद्ध लढावे लागेल, असे जेटली म्हणाले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×