त्यांचं सगळं ठरलंय…(अग्रलेख)

शिवसेनेचा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित वर्धापन दिन कार्यक्रम संपन्न झाला. शिवसेनेचे असेही सगळे बहुचर्चितच असते. मात्र यंदाचा कार्यक्रम विशेष होता. साक्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार होते. त्यामुळे जरा जास्तच चर्चा. कोणी म्हणेल त्यात काय विशेष? सेनेच्या कार्यक्रमांना खुद्द अटल बिहारी वाजपेयीही यायचे. तेही पंतप्रधान असताना. लालकृष्ण आडवाणी, सुषमा स्वराजही यायच्या. प्रमोद महाजन तर अगदी घरचे होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या येण्याची एवढी काय चर्चा? मुद्दा रास्त आहे. मात्र पूर्वी जे बडे नेते येऊन गेले तो काळ वेगळा होता. तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात होतेच आणि शिवसेना राज्यात अधिकृतपणे मोठा भाऊ होता. त्यामुळे सेनेला मानही होता आणि त्यांचा दराराही.

बाळासाहेबांच्या पश्‍चात त्यांचे नाव घेत आणि ऐकवत शक्‍य तितका दरारा टिकवण्याचा प्रयत्न त्यांच्या शिवसेना या लढवय्या संघटनेने प्राणपणाने केला. मात्र तो टिकला नाही. हेच वास्तव. ते गेल्या पाच वर्षांत सेनेच्या हितचिंतकांनीही पाहिले आणि सर्व शिवसैनिकांनीही. सत्तेत वाटा मिळावा असा हापापलेपणा बाळासाहेबांनी कधीच दाखवला नाही. सत्तेवर लाथ मारण्याची धमक त्यांच्यात होती. त्यांनी स्वाभिमान जपला. त्यांच्या या गुणवैशिष्ट्यामुळेच बाळासाहेब तमाम शिवसैनिकांचे देव झाले.

स्वकीय आणि परकीयांचेही श्रद्धास्थान झाले. सेनेसोबत असो वा नसो, बाळासाहेबांच्या बद्दल वाकडे बोलण्याची कोणाची छाती झाली नाही. हा त्या झंझावाताचा करिश्‍मा होता. मात्र तो इतिहास झाला. आज उद्धवजींच्या भाषेत ज्या भाजप शिवसेना युतीला भावनेच्या आधारावर झालेली, प्रदीर्घ काळ टिकलेली आणि नैसर्गिक युती म्हटले जाते त्या युतीला हादरे बसले आहेत. गेल्या वेळेच्या लोकसभा निवडणुकीनंतर सगळ्यांनीच ते पाहिले आहे. वाजपेयी आणि आडवाणी युगाचा अस्त आणि मोदी-शहा युगाचा प्रारंभ हे त्याचे मूळ कारण. पक्षाशी प्रातारणा करून मिळणाऱ्या सत्तेला आपण चिमट्यानेही स्पर्श करणार नाही, असे अटलजी म्हणायचे. त्यांनी पक्षावर तर प्रेम केलेच, पण विरोधकांवरही प्रेम केले.

आडवाणी यांची पोलादी पुरूष, कट्टर अशी प्रतिमा भलेही रंगवली गेली. मात्र त्यांनीही विरोधकांचा सन्मान केला. भारतीय लोकशाहीचा हा आत्मा या नेत्यांनी जपला. हल्लीच्या भाजपचे गृहीतक वेगळे आहे. दोन नेत्यांनी पक्षाला निवडणुका जिंकणारे मशीन करून टाकले आहे. त्यांच्या उदयानंतर भाजपचाच देशातील बहुतेक राज्यांत सूर्योदय झाला आहे. मुंबईसह महाराष्ट्रात तिप्पट ताकद वाढली. भावना श्रेष्ठ की व्यवहार हा प्रश्‍न त्यांना विचारला तर व्यवहार हेच त्यांचे उत्तर असेल. असेही राजकारणात भावनेला थारा नसतो. तत्कालीन स्थिती ओळखून मित्र आणि शत्रू निवडावे आणि बदलावे लागतात. त्यामुळे या दोन नेत्यांच्या राजवटीत शिवसेनेला जो बाळासाहेबांच्या काळात आदर मिळत होता, तो मिळाला नाही.

पण भूतकाळात रमत आणि त्यावेळेच्या ताकदीच्या गमजा करत वर्तमानात तुमचे मूल्य वाढत नाही. केंद्रात सत्तेत असूनही नगण्य स्थान आणि महत्त्व हे एकवेळ कमी त्रासदायक. मात्र राज्यातले गेलेले थोरलेपण अत्यंत वेदनादायी आणि सतत बोचणारे. ते सेना नेतृत्वाने अनुभवले. केवळ त्यांनीच नाही, तर बाळासाहेबांनी घडवलेल्या प्रत्येक शिवसैनिकांनी अनुभवले. “आरे’ ला “कारे’ म्हणायची धमक असलेली ही संघटना. मुळात यांना आरे म्हणायची कोणाची हिंमतच नाही. पण केवळ आरेच नाही, तर “पटक देंगे’ म्हणण्यापर्यंत लोकांची मजल गेली. तेही ऐकून घ्यावे लागले. न ऐकून सांगतात कोणाला? हा शिवसेनेचा गेल्या पाच सात वर्षांतील पट. शिवसेना इतकी निष्प्रभ आणि थंड कधीच दिसली नाही. हे सगळे उगाळायचे कारण म्हणजे आता गेल्या दोन तीन महिन्यांत दोन्ही पक्षांत सुरू झालेला नवा रोमान्स.

बाळासाहेबांचा आशीर्वाद, उद्धवजींचे प्रेम आणि शिवसैनिकांची ऊर्जा घेण्यास आपण आलो आहोत, असे मुख्यमंत्री काल म्हणाले. त्यांचे हे वाक्‍य टाळ्या घेणारेच. जगातल्या कोणत्याही नेत्याने भावनेला हात घेणारे असे वाक्‍य टाकले की, समोरचा प्रेमात पडणारच. लोकसभेच्या तोंडावरही मुख्यमंत्र्यांनी असेच शिवसैनिकला प्रेमात आंधळे व्हायला भाग पाडणारे वाक्‍य टाकले. राज्यात मोठा भाऊ कोण, हा विषय संपला आहे. उद्धवजी माझे मोठे भाऊ आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांचे मोठे भाऊ आहेत, या एकाच वाक्‍यात फडणवीसांनी अख्खी शिवसेना आपल्याकडे वळवली. त्यांच्याकडे ही गुणवत्ता आणि समयसूचकता आहे.

उगाचच नाही त्यांनी पाच वर्षे राज्य केले. ते जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा भाजपमध्येच किमान अर्धा डझन लोक मुख्यमंत्री होण्यास इच्छुक होते. काही जण तर सिनीऑरीटीच्या नावे मुख्यमंत्री आपणच असल्याच्या तोऱ्यात होते, तर काहींनी स्वत:ला “जनतेच्या मनातली मुख्यमंत्री मीच’ असे म्हणत आपलीच “मन की बात’ करून टाकली. या सगळ्यांना नामोहरम करण्यापासून मोदी शहांकडून मंत्रिमंडळ विस्तारात फ्री हॅंड मिळवण्यापर्यंतची किमया फडणवीस यांनी करून दाखवली. कॉंग्रेसच्या संस्कृतीत वाढलेल्या आणि दिल्लीत रांगेत उभ्या राहणाऱ्या कोणाही मुख्यमंत्र्याला हे जमले नाही. हा फडणवीसांचा विशेष गुण. आता त्यांच्या कालच्या उपस्थितीने आणि तेथे केलेल्या भाषणाने त्यांनी त्यांचा सत्ता प्राप्तीचाच निर्धार व्यक्‍त केला आहे.

विरोधी पक्षातील प्रबळ घराणी तर फोडलीच, पण गेली पाच वर्षे यथेच्छ टवाळी करणाऱ्या मित्रालाही त्यांनी काबुत केले. युती करतानाच आम्ही सगळ्या गोष्टींचा विचार केला आहे. आमचं ठरलंय, तुम्ही चिंता करू नका, असे उद्धव ठाकरे लाख म्हणोत. पण काय ठरलंय हे त्यांना तरी माहीत आहे का, असा प्रश्‍न पडावा अशा कोलांट्या गेल्या काळात मारल्या गेल्या आहेत. लोकसभेचे उपसभापती पद, केंद्रात महत्त्वाचे मंत्रिपद यातले काहीही मिळालेले नाही. राज्यात समान जागा लढवूनही भाजपला मागे टाकण्याची आजच्या शिवसेनेची स्थिती नाही. त्यामुळे मुख्यमंत्रीपद हेही असेच आळवावरचे पाणी ठरावे. असे असताना उद्धवजींचे काय ठरले आहे हे तेच जाणो. मात्र फडणवीस आणि त्यांचे हायकमांड मोदी-शहा यांनी त्यांना नक्‍की काय करायचे आहे, ते अगोदरच ठरवून ठेवलेले दिसतेय. शिवसेनेला केवळ भावनेच्या आधारावर युती पाहिजेय ना? दिली. मोठा भाऊ म्हटले तर बिघडते कुठे? शेवटी मोठा कोण हे जनताच ठरवणार आहे. याची भाजपच्या चाणाक्ष नेत्यांना खात्री आहे. कारण ते व्यवहार बघतात. भावना नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.