शिराळा (प्रतिनिधी) : सांगली जिल्ह्यात कोविड-19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी 11 कोटी 30 लाख रूपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यापुढेही या महामारीला रोखण्यासाठी आवश्यक सर्व निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समिती सभागृहात सांगली जिल्ह्यातील कोविड प्रादुर्भावाचा आढावा पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात सद्यस्थितीत 2 हजार 374 कोरोना बाधित रूग्ण उपचाराखाली आहेत. यातील 985 रूग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचाराखाली आहेत. त्यामुळे कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता खाजगी रूग्णालये अधिग्रहित करणे क्रमप्राप्त आहे. यासाठी खाजगी रूग्णालयांनी आवश्यक ते सर्व सहकार्य द्यावे. सर्वांनी मिळून कोरोना बाधितांवर उपचार करूया व मृत्यूदर कमीत कमी रहावा यासाठी प्रयत्न करूया, असे आवाहन पालकमंत्री जयंत पाटील यांनी खाजगी रूग्णांलयांना केले. यावेळी त्यांनी अनेक रूग्ण घाबरलेल्या स्थितीत असतात त्यामुळे ज्येष्ठ वैद्यकीय व्यवसायिकांनी त्यांच्यावर उपचार केल्यास, त्यांना धीर दिल्यास रूग्णांचे मनोधैर्य वाढेल व रूग्ण लवकरात लवकर बरा होण्यास त्याची मदत होईल. त्यामुळे संकटाच्या या वेळेत सर्वांनी मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.