पुणे – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आतात आकाशवाणीवरून इंग्रजीचे धडे देण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून “आम्ही इंग्रजी शिकतो’ या उपक्रमाचे आयोजन केले आहे. येत्या 19 जानेवारी ते 26 मार्च 2021 दरम्यान इयत्ता 4 थी ते 8 वीच्या विद्यार्थ्यांना 84 पाठ (धडे) शिकविण्यात येणार आहे, असे माहिती जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे सभापती व उपाध्यक्ष रणजीत शिवतरे यांनी दिली.
करोनामुळे ऑनलाइनच्या माध्यमातून शिक्षण सुरू आहे. मात्र, ग्रामीण भागात अनेक विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन नाहीत. त्यामुळे त्यांना कसे शिक्षण द्यायचे हा मोठा प्रश्न होता. त्यामुळे रेडिओद्वारे शिक्षण दिल्यास 100 टक्के विद्यार्थी हे एकतील आणि शिक्षण घेतील, त्यानुसार 26 जानेवारी, 19 फेब्रुवारी आणि 11 मार्च हे तीन दिवस वगळून सोमवार ते शनिवारी ठरावीक वेळेत “सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस’ या संस्थेकडून हे पाठ शिकविले जाणार आहेत. आकाशवाणी पुणे केंद्राच्या मीडियम वेव्ह 792KH2 वरूण हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे.
पुणे जिल्हा परिषदेच्या युट्युब चॅनलवरही हा कार्यक्रम उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे सर्व शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांपर्यंत हा कार्यक्रम सहजपणे पोहोचविणे शक्य होणार आहे. 2015-16 मध्ये हा उपक्रम पुणे जिल्ह्यात राबवला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या इंग्रजी संभाषण कौशल्यात सकारात्मक वाढ झाल्याचे दिसून आल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाकडून देण्यात आली.
कधी होणार प्रक्षेपण
- मंगळवार आणि बुधवारी सकाळी 10.30 ते 11 वाजता. प्रत्येकी पंधरा-पंधरा मिनिटांचे दोन पाठ शिकविले जाणार आहे.
- गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी सकाळी 10.45 ते 11 वाजता. 15 मिनिटांचा एक पाठ शिकविला जाणार आहे.
पाठाची रचना; प्रत्येक पाठाचे चारभाग
भाग 1 – पाठाची सुरवात नाटकाने होतासून, त्यामध्ये मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषा आहेत.
भाग 2 – या भागात विशिष्ट इंग्रजी शब्द व वाक्य शिक्षकांनी वहीत लिहून घ्यायचे व त्याचा वापर सरावासाठी करायचा आहे
भाग 3 – रेडिओ शिक्षक एकणाऱ्या विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधतो व इंग्रजी बोलण्याचा सराव घेतो
भाग 4 – वर्ग शिक्षक दुसऱ्या भागात लिहून घेतलेल्या नोंदीचा उपयोग करून विद्यार्थ्यांचा सराव घेतात.