पुणे: श्वास आणि ध्यास हॉकी बाळगणाऱ्या एस. ई. सोसायटीच्या एसएनबीपी इन्ट्ट्यिूट समूहाच्या वतीने हॉकीच्या प्रसारातील आता नवा अध्याय जोडण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. संस्थेच्या वतीने एक ऑक्टोबरपासून घेण्यात येणाऱ्या एसएनबीपी अखिल भारतीय हॉकी स्पर्धेत (16 वर्षांखालील मुले) या वेळी रोख 1 लाख 45 हजार रूपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. या स्पर्धेबरोबर या वेळी महिलांच्या राज्य स्तरीय हॉकी स्पर्धेचेही आयोजन करण्यात येणार आहे. मुलांच्या स्पर्धेचे हे चौथे, तर महिलांच्या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे.
ही स्पर्धा म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात 1 ते 7 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. राज्यात आणि शहरात सोळा वर्षांखालील मुलांसाठी अखिल भारतीय पातळीवर होणारी ही एकमेव स्पर्धा आहे. शाळेमध्ये हॉकीच्या सर्व सुविधा असणारी एसएनबीपी ही एकमेव शाळा आहे. संस्थेच्या चिखलीमधील मोशी येथील शाखेत हॉकीचे कृत्रिम मैदान उभारण्याचे काम सध्या जोरात सुरू आहे. या वेळी या स्पर्धेत सहा नवे संघ सहभागी होत आहेत. यातील प्रत्येकी दोन संघ पश्चिम बंगाल आणि झारखंड येथील, तर बिहार आणि ओरिसातील प्रत्येकी एक संघ असेल.
एकूण 34 सामने होणार असून, यात 480 खेळाडू खेळतील. हॉकी इंडियाचे 25 तांत्रिक अधिकारी देखील आपले काम करणार आहेत. ही स्पर्धा हॉकी इंडिया आणि हॉकी महाराष्ट्रच्या मान्यतेनेच होत आहे. 16 वर्षांखालील अखिल भारतीय स्तरावरील चौथ्या स्पर्धेत भारतातून 24 संघांचा सहभाग असेल. स्पर्धा प्रथम साखळी आणि नंतर बाद पद्धतीने होईल. सहभागी संघांची आठ गटात विभागण्यात येणार असून, प्रत्येत गटात तीन संघ असतील. साखळी फेरीत प्रत्येक संघ दोन सामने खेळेल. गटातील अव्वल संघ उपांत्यपूर्व फेरीत खेळतील.
स्पर्धेची उपांत्य फेरीची लढत 6 ऑक्टोबर रोजी, अंतिम आणि क्रमवारी सामने 7 ऑक्टोबरला होतील. मुलांच्या गटात देशातील चार विभागातून 13 राज्यातील संघ सहभागी होतील. यामध्ये उत्तर भारतामधून मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, नवी दिल्ली, हरियाना, पंजाब, दक्षिणेतून झारखंड, कर्नाटक, पूर्वेकडून पश्चिम बंगाल, ओडिशा, तर पश्चिमेकडून महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात या राज्यांचा समावेश आहे.
दोनवेळचे विजेते मध्य प्रदेश अकादमी आणि गतविजेता पुण्यातील क्रीडा प्रबोधिनीचा संघ देखील या वर्षी पुन्हा एकदा आपला लौकिक दाखिवण्यासाठी स्पर्धेत उतरणार आहेत. त्याचबरोबर दिल्ली येथील शहीद भगतसिंग स्कूल, हॉकी क्रूग तसेच भिवानी जय भारत ऍकॅडमी या प्रमुख संघांनी देखील आपला प्रवेश निश्चित केला आहे. यजमान या नात्याने एसएनबीपी संस्थेचे दोन संघ सहभागी होतील. स्पर्धेतील विजेत्यांना रोख 50 हजार रुपयाचे पारितोषिक दिले जाणार आहे. उपविजेत्या संघास 30 हजार रूपये, तर तिसऱ्या क्रमांकाच्या संघास 20 हजार रुपये मिळतील.
दरम्यान, दुसरी राज्य स्तरीय महिला हॉकी स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून सुरू होईल. यामध्ये राज्यातील आठ जिल्ह्यांचे संघ सहभागी होतील. ही स्पर्धा थेट बाद फेरी पद्धतीने खेळविण्यात येईल. महिला गटातील विजेत्यास रोख 20 हजार, तर उपविजेत्यास 15 हजार आणि तिसऱ्या क्रमांकास 10 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. यापूर्वीचे या स्पर्धेत 2016 मध्ये मध्य प्रदेश अकादमी व शहिद भगतसिंग स्कूल,(दिल्ली ) हे अनुक्रमे पहिल्या दोन क्रमांकांचे मानकरी ठरले होते. तर क्रीडा प्रबोधिनी संघास तिसरा क्रमांक मिळाला होता. 2017 मध्ये पुन्हा मध्य प्रदेश अकादमीने विजेतेपद मिळविले तर क्रीडा प्रबोधिनीने उपविजेतेपद पटकाविले. हॉकी क्रूग संघास तिसरा क्रमांक मिळाला. 2018 मध्ये क्रीडा प्रबोधिनी संघाने विजेतेपद मिळविले तर मध्य प्रदेश अकादमीला उपविजेतेपद मिळाले. हरयानाच्या भिवानी जय भारत अकादमीला तिसरे स्थान मिळाले होते.