लंडन – भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याला ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा धक्का बसला. त्याने यंदाच्या स्पर्धेत आश्वासक सुरूवात केली होती. मात्र, या सामन्यात त्याला सूर गवसला नाही. त्याला उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात एम. कलजोवकडून 21-17, 16-21 व 21-17 असा तीन गेममध्ये पराभव पत्करावा लागला.
या सामन्यात कलजोवने पहिली गेम जिंकल्यावर सेनने ठाताच पुनरागमन केले होते. त्याने दुसरी गेम जिंकत बरोबरी केली होती. मात्र, अखेरच्या निर्णायक गेममध्ये त्याला अपयश येत होते. अखेर त्याच्यावर निसटता विजय मिळवण्यात कलजोवला यश आले. महिला दुहेरी गटात अश्विनी पोनप्पा व एन. सीक्की रेड्डी जोडीला सी. सेनिन व एस. पिएक या जोडीने 24-22 व 21-12 असे सहज पराभूत केले.
भारताची अव्वल खेळाडू व ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू तसेच नवोदित बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठली. सेनने पहिल्यांदाच या फेरीत प्रवेश केला असून सिंधूलाही गेल्या चार मोसमांत प्रथमच ही फेरी गाठता आली आहे. एच. एस. प्रणॉय व बी. साईप्रणितचे आव्हान मात्र संपुष्टात आले.
2019 साली पाच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळवणाऱ्या लक्ष्य सेनने फ्रान्सच्या थॉमस रॉक्सेलचा 21-18, 21-16 असा पराभव केला. मात्र, जागतिक क्रमवारीत अग्रस्थानावर असलेल्या जपानच्या केंटो मोमोटापुढे प्रणॉयला पराभव पत्करावा लागला. मोमोटाने प्रणॉयचा 48 मिनिटांत 21-15, 21-14 असा पराभव केला. डेन्मार्कच्या व्हिक्टर एक्सेलसेनने साईप्रणितला 15-21, 21-12, 21-12 असे पराभूत केले. याचप्रमाणे महिला एकेरीत सिंधूने केवळ 25 मिनिटांत डेन्मार्कच्या लिने ख्रिस्टोफरसेनचा 21-8, 21-8 असा पराभव केला.
सिंधूची उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या तिसऱ्या मानांकित अकानी यामागुचीशी गाठ पडणार आहे. मिश्र दुहेरीत सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि अश्विनी पोनप्पाची वाटचाल खंडित झाली. जपानच्या युकी कॅनेको आणि मिसाकी मॅटसुटोमो जोडीने पहिल्याच फेरीत सात्त्विक-अश्विनीचा 21-19, 21-9 असा पराभव केला. डेन्मार्कच्या रासमुस ईस्परसेन आणि ख्रिस्टिन बुश जोडीने प्रणव जेरी चोप्रा आणि एन. सिक्की रेड्डी जोडीचा 21-15, 21-17 असा पराभव केला.