नागरिकांच्या गटाधिकाऱ्यांच्या दालनात दिवसभर ठिय्या

मुख्याधिकाऱ्यांची ठेकेदार, सल्लागाराला नोटीस

पालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांनी ठेकेदार धनंजय अर्जुन चितळे व सल्लागार संजयकुमार पटवा यांना यासंदर्भात नोटीस पाठवली असून त्यामध्ये म्हटले आहे की, सिटी सर्वे नंबर 1071 जागेमधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारत खोल्या पाडलेले निदर्शनात आले आहे. सदर इमारत खोल्या पाडण्याकरिता पंचायत समितीकडे पत्र दिलेले आहे परंतु अद्याप त्याबाबत परवानगी प्राप्त झालेली नसतानाही सदर खोल्या इमारत पाडण्याची कारवाई आपले स्तरावर करण्यात आलेली आहे याबाबत तत्काळ खुलासा करण्यात यावा.

पाथर्डी – शहरातील सिटी सर्वे नंबर 1071 मधील जिल्हा परिषद प्राथमिक मुलींच्या शाळेच्या खोल्या बेकायदेशीरपणे पाडणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात दिवसभर ठिय्या आंदोलन केले. तहसीलदार नामदेव पाटील यांनी आंदोलकांची भेट घेऊन संबंधित प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते किसन आव्हाड म्हणाले की, शाळाखोल्या शेजारी असलेले खुले नाट्यगृह विकसित करण्यासाठी पालिकेने काम सुरु केलेले आहे. पालिकेचे मुख्याधिकारी व अभियंता यांनी स्वतः उपस्थित राहून शहरातील एका ठेकेदारामार्फत शाळेची इमारत पाडलेली आहे. निर्लेखन परवाना नसताना शाळाखोल्या कोणाच्या आदेशाने पाडल्या. खोल्या पाडल्यानंतर त्यामध्ये निघालेल्या साहित्याची परस्पर विल्हेवाट कोणी लावली.

या घटनेला आठ ते दहा दिवस उलटूनही शिक्षण विभागाची भूमिका संशयास्पद वाटते. या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होऊन दोषीं अधिकारी व ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. गट शिक्षणाधिकारी शिवाजी कराड यांनी दिलेल्या उत्तरामुळे आंदोलकांचे समाधान झाले नाही. जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली.

तहसीलदार नामदेव पाटील यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन संबंधित प्रकरणाची अधिक माहिती घेऊन कारवाई करण्यात येईल असे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात मनसेचे संतोष जिरेसाळ, अविनाश पालवे, भास्कर दराडे, अविनाश टकले, संजय शिरसाट, सूनील पाखरे, गोरक्ष ढाकणे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.