सव्वा कोटी रूपयांचे पॅचिंग पुन्हा खड्ड्यात

निकृष्ट कामामुळे पालिकेचा बांधकाम विभाग रडारवर

सातारा – सातारा शहरात सुरू असलेली पॅचिंगची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची होत असून त्यात डांबराचा पत्ताच नाही अशी ओरड सुरू झाली आहे. शहरातील बारा रस्त्यांच्या पॅचिंगचे 1 लाख 29 हजार रूपये खड्ड्यात गेले असून कामाच्या दर्जाबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

सातारा शहरासह जिल्ह्यात यंदा अतिवृष्टीने थैमान घातल्याने येथील रस्त्यांची प्रचंड वाट लागली होती. दोन्ही वाड्यावरून राजकीय कानपिचक्‍या मिळाल्यानंतर कामाला लागलेल्या सातारा पालिकेने शहरातील बारा रस्त्यांच्या दुरूस्तीची निविदा काढून बोगदा परिसरातून पॅचिंगच्या कामाला सुरूवात केली होती. बोगदा ते अदालत वाडा, शाहू चौक, बारटक्के चौक ते राधिका चौक, व्यंकटपुरा येथे धनिणीची बाग ते गोखले हौद, मल्हार पेठ कॉर्नर ते खंडोबाचा माळ, इ पाच रस्त्यांची कामे झाल्यानंतर ‘प्रभात’ ने या कामाचा आढावा घेतला असता ही कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाल्याचे स्पष्ट झाले. ज्या अदालत वाड्यासमोर नगराध्यक्षांनी कामाची पाहणी केली तेथील पॅचिंगची खडी हटल्याने रस्त्याचे खड्डे उघडे पडले आहेत. हाच प्रकार मल्हार पेठ कॉर्नरलासुध्दा झाल्याने पालिकेच्या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

सध्या राधिका चौक ते बारटक्‍के चौक या भागात पॅचिंगचे काम सोमवारी सकाळी उरकण्यात आले. खड्ड्यांची स्वच्छता करून त्यावर खडी टाकून वरून डांबराचा सडा मारायचा आणि वरून रोलरने पिचिंग करायचे, अशा सरधोपट पध्दतीने कामे सुरू असल्याने या पॅचिंगच्या कामाची बोंब होणारचं हे उघड आहे. मात्र या कामावर बांधकाम विभागाचा कोणतेही नियंत्रण नाही. बांधकाम विभागाचे अभियंता केवळ पाहणी करतात मात्र तांत्रिक अडचणीमुळे दर्जेदार कामाचा आग्रह मात्र ते अजिबात धरत नाही. त्यामुळे सातारकरांच्या घामाचे 1 कोटी 29 लाख रुपये खड्ड्यात घालून त्यांच्याच तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार सुरू असल्याने साताऱ्यात हे असचं चालायच असे उद्विग्न सूर ऐकायला येत आहे.

पॅचिंगच्या कामात डांबराचा पत्ता नाही
पावसामुळे शहरातील रस्त्यांची अक्षरश: दयनीय अवस्था झाल्याने नागरिकांमधून होत असलेल्या संतापानंतर आता पालिका प्रशासनाने रस्त्यांवरील खड्ड्यांच्या पॅचिंगचे काम सुरु केले आहे. मात्र रस्त्यांचे पॅचिंग करत असताना संबंधित ठेकेदाराकडून रस्त्याच्या दर्जाकडे अजिबात लक्ष दिले जात नाही. विशेष म्हणजे खड्डे भरत असताना डांबराचा अत्यल्प वापर केला जात असून पॅचिंगच्या कामासाठी डांबर वापरला जात आहे की नाही हेच समजत नाही. दर्जाहिन पॅचिंगच्या कामामुळे नुकतेच भरलेले खड्डे पुन्हा जैसे थे झाले आहेत.

बिले मिळत नसल्याने ठेकेदारांची कामाकडे पाठ
बिले वेळेवर अदा होत नसल्याने ठेकेदारांनी सध्या रस्ते दुरूस्तीच्या कामाकडे पाठ फिरवली आहे. माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून झाडाझडती झाल्यावर ठरलेल्या सहा ठेकेदारांची बैठक नगराध्यक्षांनी घेतली होती. पैकी दोघांनी कामात असमर्थता दर्शवली, एकाची कानउघाडणी झाल्याने त्यांनी बैठकीतून काढता पाय घेतला, अन्य दोघांच्या निविदांची तांत्रिक अडचणं झाली. त्यामुळे सातारा शहरात एकनाथ सुतार या एकमेव ठेकेदारावर पॅचिंगच्या कामाचा भार आहे. शहरात खड्डे सतराशे साठ असून दुरुस्ती यंत्रणा प्रचंड तोकडी असल्याने पॅचिंगचे 1 कोटी 29 लाख खड्ड्यात गेल्यात जमा आहेत.

राजकीय मरगळ झटका अन्‌ कामाला लागा
साताऱ्यात राजकीय टायमिंगसाठी उदयनराजे व शिवेंद्रराजे भोसले ही दुकली प्रसिद्ध आहे. मात्र पवारांनी साताऱ्यात असे काही टायमिंग लावले की सगळीच राजकीय गणिते चुकली. साताऱ्यातूनच टायमिंग चुकायचे सुरू झालेले लोण थेट राज्यात पोहचले. भाजप सत्तेत येणार म्हणता म्हणता पवारांनी महाशिवआघाडीची सत्ता आणली.

दोन्ही राजेंचे भाजप प्रवेशाचे टायमिंग चुकल्याने सातारा तालुक्‍याच्या राजकारणाला प्रचंड मरगळ आली आहे. उदयनराजे अजून नेहमीच्या डॅशिंग मूडमध्ये नसल्याने नगरपालिकेत अंधेर नगरी चौपट राजा असा कारभार सुरू आहे. दोन्ही राजांनी राजकीय मरगळं झटकून साताऱ्याच्या विकासासाठी निधी आणण्यासाठी पुन्हा तयारी करणे गरजेचे आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.