गांधीनगर – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असून राष्ट्रपती झाल्यानंतरचा त्यांचा हा पहिला गुजरात दौरा आहे. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या गुजरातमध्ये सगळ्या देशाचे मीठ तयार केले जाते व सगळे देशवासी गुजरातचे मीठ खातात असेही म्हटले जाते, असे नमूद करत या राज्यात औद्योगिक विकासासोबतच पर्यावरण रक्षणालाही प्राधान्य दिले जात असल्याबद्दल त्यांनी प्रशंसा आणि अभिनंदन केले.
त्या म्हणाल्या, देशात सगळ्यात जास्त सौर ऊर्जेची निर्मिती याच राज्यात होते असे मला सांगण्यात आले. याचा अर्थ याही क्षेत्रात गुजरात पहिल्या स्थानावर आहे. गुजरातचे नागरिक आपले कठोर परिश्रम, समर्पित वृत्ती आणि सेवाभावासाठीही जगभरात ओळखले जातात.
देशात झालेल्या दुधाच्या धवल क्रांतीतही या राज्याचा मोठा वाटा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाच्या 12 वर्षांच्या कार्यकाळात या राज्याच्या विकासाची सगळी दारे खुली केली व देशासमोर गुजरातचे विकासाचे एक आदर्श मॉडेल सादर केले. दरम्यान, राष्ट्रपतींनी महात्मा गांधी यांच्या साबरमती येथील आश्रमालाही आज भेट दिली.