सर्व कंपन्यांनी कामगारांना सुट्टी जाहीर करावी

कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे आदेश

रांजणगाव गणपती  (वार्ताहर) – करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रांजणगाव औद्योगिक वसाहतीसह राज्यभरातील सर्व कंपन्यांनी कामगारांना सुट्टी जाहीर करावी, यासाठी संबंधित सर्व विभागांना आदेश देण्यात आले असल्याचे कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.

करोना आजाराचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने योग्य ती पावले उचलली असून दोन-तीन दिवसांपासून कंपन्या सुरू असल्याच्या अनेक तक्रारी येत होत्या. या तक्रारींची दखल घेत संबंधित जिल्ह्यांमधील कामगार आयुक्त, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना याबाबत सूचना दिल्या आहेत. रविवारी (दि. 22) व सोमवारी अनेक कंपन्या सुरू असल्याचे निदर्शनास आले; मात्र मंगळवारपासून अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व कंपन्या बंद राहतील असेही कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी सांगितले.

रांजणगाव एमआयडीसी तसेच शिरूर तालुक्‍यातील बहुतांश कंपन्यांमध्ये पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांमधून अनेक कामगार येत असतात. त्याचप्रमाणे शिरूर, शिक्रापूर व अन्य परिसरामध्ये अनेक कामगार वास्तव्यास आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या परिसरातील सर्व कंपन्या बंद ठेवण्यात याव्यात, अशी मागणी क्रांतीवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पांचगे, कारेगावचे सरपंच अनिल नवले, भाजप कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गणेश ताठे व शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख पोपट शेलार व कामगारांनी केली होती.

या मागणीची दखल घेत कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सर्व कंपन्या बंद राहतील या दृष्टीने पावले उचलली आहेत. त्याचप्रमाणे नागरिकांनी शासनाच्या आदेशांचे पालन करावे, असे आवाहन यावेळी कामगार मंञी दिलीप वळसे पाटील यांनी केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.