कलामंडळांची प्राथमिक तयारी ऑनलाइन सुरू
पुणे – दरवर्षी शैक्षणिक वर्षाच्या अंतिम सत्राची परीक्षा झाल्यानंतर कलाप्रेमी विद्यार्थ्यांची आगामी काळातील करंडक स्पर्धांसाठीची तयारी सुरू होते. यंदा ही तयारी काही अंशी लांबली आहे. तरी देखील विद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्राथमिक तयारी सुरू केली आहे.
परीक्षा झाल्यानंतर साधारण मे महिन्यापासून पुढील शैक्षणिक वर्षातील करंडक स्पर्धांच्या तालमींना सुरुवात होते. सिम्बायोसिस नाट्य वाचन करंडकाने महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांची सुरूवात होते. त्यानंतर पुरुषोत्तम करंडक, भरत करंडक, फिरोदिया करंडक, थेस्पो आदी नाट्य स्पर्धांची रेलचेल सुरू होते.
यंदा आयोजकांनी परिस्थितीनुसार गरज पडल्यास स्पर्धा पुढे ढकलाव्यात. परंतु रद्द करू नये, हीच अपेक्षा विद्यार्थ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. “लॉकडाउननंतर काय परिस्थिती असेल साशंकता आहे, परंतु, हे सर्व लवकरच सुरू होईल,’ याची खात्री वाटत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. “लॉकडाउनचा चांगला उपयोग करून, दर्जेदार लेखन साहित्याची निर्मिती होत आहे.
करंडक स्पर्धांसाठी प्रामुख्याने लिखाण सुरू आहे,’ असे आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचा कलामंडळ प्रमुख ऋषभ राठोड याने सांगितले. “सध्या आम्ही व्हिडिओ कॉलवर नियोजन करत असून, प्राचार्य आणि शिक्षकांशी संपर्क साधण्यात येत आहे,’ असे सिम्बायोसिस महाविद्यालयाच्या कलामंडळाचा प्रमुख मिहीर अमृतकर याने सांगितले.