मुंबई : अरबी समुद्रात एका खडकाला धडकून 88 प्रवाशी घेऊन जाणारी बोट बुडाली. शनिावारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास ही दूर्घटना घडली. गेट वे ऑफ इंडियाहून निघाल्यानंतर मांडवा जेटीकडे प्रवासी घेऊन ही “अजंठा” बोट जात होती. मात्र सर्व प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे.
या बोटीत 88 प्रवाशी होते. मांडवा जेट्टीपासून एक किमी अतरावर असताना बोट खडकाला धडकली. त्यामुळे बोटीत पाणी शिरून ती बुडू लागली. बोटीतील लहान मुले आणि महिलांनी मदतीसाठी आक्रोश सुरू केला. बोटीवरील कर्मचाऱ्यांनी मदतीसाठी सागरी पोलिसांशी संपर्क साधला. अन्य यंत्रणा आणि सागरी पोलिसांना सर्तकतेचा आदेश देण्यात आला.
पोलिस नाईक प्रशांत घरत आणि दोन कर्मचाऱ्यांसह त्यावेळी तेथून जात होते. ते त्या बोटीजवळ पोहोचले. त्यांनी ताताडीने मदत कार्य सुरू करत बोटीवरील कर्मचाऱ्यांच्या मदतीने सर्व प्रवाशांना आपल्या बोटीत घेतले. त्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाने सर्व प्रवासी आणि बोटीतील कर्मचारी सुखरूप बचावले, असे रायगडचे जिल्हा पोलिस अधीक्षक अनिल परस्कर यांनी सांगितले.
घरत यांनी 80 प्रवाशांना आपल्या बोटीत घेतले. तर आठ जणांना दुसऱ्या खासगी बोटीतून आणण्यात आले. बोटीतील सर्व जणांना सुरक्षितपणे मांडव्यात आणण्यात आले. ही बोट ओढून किनाऱ्यावर आणण्यात आली.