वुहान (चीन) : करोना विषाणूचा सर्वाधिक प्रादुर्भाव झालेल्या चीनमधील वुहान प्रांतात प्रशासनाने उभारलेली सर्व 16 तात्पुरती हॉस्पिटल बंद करण्यात आली आहेत. या हॉस्पिटलपैकी अखेरची दोन हॉस्पिटल मंगळवारी बंद करण्यात आली.
वुचांग येथील तात्पुरत्या हॉस्पिटलमधील 49 रुग्णांची तुकडी उपचार घेऊन हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यावर हे हॉस्पिटल लगेच बंद करण्यात आले आहे. वुचांग हॉगशॉंग स्टेडियममध्येच 5 फेब्रुवारी रोजी हे तात्पुरते हॉस्पिटल उभारण्यात आले होते.
या हॉस्पिटलमध्ये 784 रुग्णांची सोय होती. तर महिन्याभरात या हॉस्पिटलमध्ये 1,124 रुग्णांवर उपचार करण्यात आले होते. तर 833 जणांना उपचार करून घरी पाठवून देण्यात आले. मात्र 291 रुग्णांना अन्य हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते.
तर 14 फेब्रुवारीला आणखी एक तात्पुरते हॉस्पिटल उभारण्यात आले होते. 26 दिवस सुरू ठेवल्यानंतर ते मंगळवारी संध्याकाळी बंद करण्यात आले. हे हॉस्पिटल स्पोर्टस सेंटरमध्ये सुरू करण्यात आले होते.
वुहानमध्ये अशा प्रकारच्या 16 ठिकाणी तात्पुरत्या हॉस्पिटलची उभारणी करण्यात आली होती. हॉस्पिटलमध्ये विलगीकरण वॉर्ड उभारण्यस जागा शिल्लक राहिली नसल्यामुळे या तात्पुरत्या हॉस्पिटलमध्ये विलगीकरण कक्षाची सुरूवात करण्यात आली होती. या कक्षांमधून रुग्णांवर प्राथमिक उपचार करण्यात आले होते.
मात्र प्राथमिक उपचारांची गरज संपल्यामुळे आता या विशेष रुग्णालयांची गरज राहिलेली नाही. म्हणून ती बंद करण्यात येत असल्याचे शिक्षणतज्ञ झ्यांग बोली यांनी सांगितले.