नवी दिल्ली : दिल्लीतील सत्तारूढ आम आदमी पक्षाच्या (आप) माजी आमदार अलका लांबा यांनी शनिवारी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे 25 वर्षांच्या खंडानंतर त्या स्वगृही परतल्या आहेत.
लांबा यांनी कॉंग्रेसच्या माध्यमातून राजकीय कार्याचा श्रीगणेशा केला. तब्बल 20 वर्षांनी कॉंग्रेसचा हात सोडून त्या 2014 मध्ये आपमध्ये दाखल झाल्या. त्यानंतर पुढच्याच वर्षी झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत त्या आपच्या तिकिटावर चांदणी चौक मतदारसंघातून विजयी झाल्या. मात्र, मागील काही काळापासून त्यांचे आप नेतृत्वाशी मतभेद निर्माण झाले.
मागील महिन्यात त्यांनी आपमधून बाहेर पडण्याचा मनोदय व्यक्त केला. नंतर त्यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही भेट घेतली. त्यामुळे दिल्ली विधानसभेचे सभापती रामनिवास गोयल यांनी त्यांना पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत आमदार म्हणून अपात्र ठरवले. अखेर दिल्ली कॉंग्रेसचे प्रभारी पी.सी.चाको यांच्या उपस्थितीत अलका यांनी अपेक्षेप्रमाणे त्या पक्षात फेरप्रवेश केला.
स्वगृही परतल्यानंतर अलका यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर टीकेची झोड उठवली. केजरीवाल कुठलेही ठोस कार्य करू शकले नाहीत. आता पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ते दिल्लीकरांना मुर्ख बनवण्यासाठी पोकळ आश्वासने देत आहेत, असे त्या म्हणाल्या.