‘आई माझी काळू बाई’ या मालिकेतून अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड बाहेर पडली आहे. प्राजक्ताला तिच्या चुकीच्या वागण्यामुळे मालिकेतून काढलं आहे, असं मालिकेच्या निर्मात्या अलका कुबल- आठल्ये यांनी सांगितलं. त्यांनी या सगळ्या प्रकाराबाबत अलका कुबल यांनी राजश्री मराठीला दिलेल्या मुलखतीत संविस्तर सांगितलं होतं.
पण अलका यांनी नुकताच माफी मागणारा एक व्हिडियो शेअर केला आहे. यामध्ये त्या म्हणतात, ‘ काल मालिकेच्या चाललेल्या वादादरम्यान मी आदरणीय स्वराज्य रक्षक संभाजी महाराज असा उल्लेख न करता फक्त संभाजी मालिका हा उल्लेख केला. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांच्याबाबत मला नितांत आदर आहे. अनावधानाने माझ्याकडून घडून गेलं याबाबत मी मनापासून दिलगिरी व्यक्त करते.’
‘आई माझी काळूबाई’ या मालिकेतून अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडला या मालिकेतून काढून टाकल्याचं सांगत अलका कुबल यांनी तिच्यावर काही आरोप केले आहेत. अभिनेत्री वीणा जगताप या मालिकेत प्राजक्ताची जागा घेईल.
प्राजक्ता गायकवाड ही सेटवर अत्यंत वाईट वागायची. तिला भान नसायचं. कोरोनाच्या काळात आमच्या सेटवर काहींना बाधा झाली होती. त्यात तिने माणूसकी दाखवली नाही. सेटवरील बाकी सगळ्यांशी ती वाईट वागायची. शरद पोंक्षे यांनी अनेकदा माझाकडे तिच्याबाबत तक्रार केली मात्र मी त्याकडे दुर्लक्ष केलं, असं अलका कुबल म्हणाल्या होत्या.