यवत- येथील सहकारनगरात अलिशान कारमध्ये व घरात चालणाऱ्या मटका अड्ड्यावर पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) पथकाने गुरुवारी (दि. 6) सायंकाळी छापा टाकून 5 लाख 32 हजार 625 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यवत पोलीस ठाण्यामध्ये 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत सातारा येथील कनेक्शन असल्याचे निष्पन्न झाले आहे. तेथील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दत्तात्रय चव्हाण (वय 36, रा. कातरखडक, ता. मुळशी), अतीश जाधव (वय 22, रा. गोणसरी, ता. चिपळूण), संदीप ऊर्फ धर्मा चव्हाण (वय 35, रा. भोर), जितेंद्र चव्हाण (वय 32, रा.सहकारनगर, यवत, ता. दौंड), असे अटकेतील चौघांची नावे आहेत. ग्रामीण भागात अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी आदेश दिले होते.
गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, महेश गायकवाड, निलेश कदम, सुभाष राऊत, गुरू गायकवाड यांचे पथक सायंकाळी यवत हद्दीत पेट्रोलिंग करीत होते.
पथकास सहकारनगर येथे राजू शेंडगे याच्या घरासमोरील कारमध्ये व घरात मटका, जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने यवत ठाण्याचे हवलदार शैलेश लोखंडे व संतोष पंडित यांची मदत घेऊन सहकारनगर येथे स्कोडा कार व शेंडगेच्या घरावर छापा टाकून चार जणांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून मटका, जुगाराची साधने, रोख 4 हजार 500 रुपये, स्कोडा सुपब कार, असा एकूण 5 लाख 32 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मटक्याचा खेळ हा समीर शेख (रा. सातारा) याच्या व्हॉट्सऍपला पाठवून ऑनलाइन मटका व पैशांची देवाणघेवाण केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्यासह एकूण 5 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर 4 आरोपी व मुद्देमाल यवत पोलिसांकडे सुपूर्द केले.