Alpha Release Date Announced | अभिनेत्री आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ लवकरच ‘अल्फा’ या चित्रपटात दिसणार आहे. यामध्ये दोघी दोन सुपर एजंट्सच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता आहे. निर्मात्यांनी आज ‘अल्फा’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.
YRF स्पाय युनिव्हर्समध्ये बॉलिवूड ब्लॉकबस्टर ‘एक था टायगर’, ‘टायगर 3’, ‘पठाण’, ‘वॉर’ आणि आगामी ‘वॉर 2’ यांचा समावेश आहे. यशराज फिल्म्सने नुकतीच आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. त्यांनी म्हटलं आहे, “२०२५ च्या ख्रिसमसला अल्फा प्रेक्षकांच्या भेटीला येणार! एक थरारक आणि अॅक्शनने भरलेला सण अनुभवण्यासाठी सज्ज व्हा… २५ डिसेंबर २०२५.” या चित्रपटात अनिल कपूर आणि बॉबी देओल यांचाही समावेश आहे. ‘अल्फा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन शिव राविल करत आहेत.
View this post on Instagram
आलिया आणि शर्वरी या दोघीही या चित्रपटात सुपर एजंटच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या ॲक्शन सीनसाठी दोन्ही अभिनेत्रींनी खूप मेहनत घेतल्याचे सांगितले जात आहे. हा चित्रपट हिंदी व्यतिरिक्त तेलुगु आणि तामिळ भाषेतही प्रदर्शित होणार आहे. ‘अल्फा’ची रिलीज डेट जाहीर झाल्यानंतर चाहत्यांमध्ये या चित्रपटाची प्रचंड उत्सुकता वाढली आहे.
दरम्यान, आलिया भट्ट सध्या जिगरा या सिनेमाच्या रिलीजच्या तयारीत आहे. या चित्रपटात ती वेदांग रैनासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. आलियाचा जिगरा 11 ऑक्टोबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.