अभिनेता अली फजल याने चित्रपटसृष्टीत दिर्घ काळ काम केले आहे. अनेक चित्रपटात त्याने आपल्या अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता तो पुन्हा एकदा हॉलिवूड चित्रपटात झळकणार असल्याची चर्चा आहे.
“फास्ट ऍण्ड फ्यूरियस’ या पहिल्या हॉलिवूड चित्रपटात त्याने एक छोटीसी भूमिका साकारली होती. त्यानंतर “व्हिक्टोरिया ऍण्ड अब्दुल’मध्ये तो डेम जूडी डेंचसोबत स्क्रीन स्पेस शेअर करताना झळकला होता. आता तो तिस-या हॉलिवूड चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मागील दोन्ही चित्रपटांप्रमाणे हाही चित्रपट सत्य कथेवर आधरित आहे.
याबाबत विचारले असता अली म्हणाला, हो, मी आणखी एक हॉलिवूड प्रॉजेक्ट साइन केला आहे. पण त्याबाबत आताच बोलणे हे खूपच घाईचे ठरेल. पुढील काही महिन्यात याबाबत फॉर्मल अनाउसंमेंट करण्यात येईल. पण सध्या मी फक्त होकार दिला आहे.
दरम्यान, या हॉलिवूड चित्रपटात अली लीड रोल साकारणार असून इराक लढाईवर या चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. हा चित्रपट सत्य कथेवर आधारित असून ते एका पुस्तकी स्वरुपात उपलब्ध आहे. चित्रपटातील अन्य कलाकार निश्चित होण्याचे बाकी असून चित्रपटाचे शूटिंग पुढील वर्षी फेब्रुवारीत सुरू होण्याची शक्यता आहे.