#ICCWorldCup2019 : विश्‍वचषक संघातून ऍलेक्‍स हेल्सची हकालपट्टी

लंडन – इंग्लंडचा मधल्या फळीतील धमाकेदार फलंदाज ऍलेक्‍स हेल्स नुकत्याच झालेल्या उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यामुळे त्याची विश्‍वचषकासाठी निवडल्या गेलेल्या संघातून हकालपट्टी करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वीच ब्रिस्टॉलमधील रस्त्यावर हाणामारी केल्याप्रकरणी याआधी हेल्सवर सहा सामन्यांची बंदी घालण्यात आली होती. हेल्सने 11 कसोटी, 70 एकदिवसीय आणि 60 ट्‌वेन्टी-20 सामन्यांमध्ये इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले आहे.

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने (ईसीबी) नियमितपणे घेतलेल्या उत्तेजक चाचणीत तो दुसऱ्यांदा दोषी आढळल्यामुळे ईसीबीचे संचालक ऍशले गाईल्स आणि निवड समितीने हा निर्णय घेतला आहे. इंग्लंडमध्ये 30 मेपासून सुरू होणाऱ्या आयसीसी विश्‍वचषक स्पर्धेसाठी ऍलेक्‍स हेल्सची इंग्लंडच्या 15 जणांच्या प्राथमिक संघात निवड करण्यात आली होती.
या कारवाईमुळे हेल्सला आयर्लंडविरुद्धचा एकमेव एकदिवसीय सामना, पाकिस्तानविरुद्धचा एकमेव ट्‌वेन्टी-20 सामना आणि पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका तसेच विश्‍वचषक स्पर्धेतील आपले स्थान गमवावे लागणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.