माणगंगा काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

म्हसवड – माण तालुक्‍यातील आंधळी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणातील पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे. त्यामुळे माणगंगा नदीला पूर आला आला असून प्रशासनातर्फे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान, पूरजन्य परिस्थितीमुळे म्हसवड शहरात पालिका प्रशासन सतर्क झाले आहे.

माणगंगा नदी उगम पावणाऱ्या कुळकजाई डोंगरपायथ्याला असलेले आंधळी धरण सध्या सुरु असलेल्या परतीच्या पावसामुळे पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला असल्याने पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. धरणातून माणगंगा नदीत मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्याने काठावरील गांवाना प्रशासनातर्फे सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. दुष्काळी माण तालुक्‍यात सुरु असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तालुक्‍यातील सर्व छोटी मोठी धरणे, तलाव, ओढे-नाले हे पूर्ण क्षमतेने भरून वाहु लागले आहेत.

माण गंगा नदीवर बांधण्यात आलेल्या अनेक बंधारे यापूर्वीच भरले असून प्रवाही झाले आहेत. त्यामुळे तालुक्‍याच्या शेवटच्या टोकाला असणारा आणि गेल्या दहा वर्षांपासून कोरडा असणारा ब्रिटिश कालावधीत बांधण्यात आलेल्या राजेवाडी तलाव (म्हसवड डॅम) गेल्या महिन्यात नदीला सोडण्यात आलेल्या उरमोडीचे पाणी व पडलेल्या पावसामुळे भरून वाहत आहे. या नदीपात्राशेजारी असलेल्या यात्रा पटांगणावर पाण्याचा फुगवटा निर्माण झाला असून रात्री आणखी पाऊस पडल्यास पूरस्थिती निर्माण होण्याची शक्‍यता नाकारता येणार नाही. त्यामुळे सकाळ पासूनच पालिका प्रशासनाकडूनही सतर्कतेच्या सुचना दिल्या जात आहेत. तसेच नदीपात्रा शेजारील शाळांना सुट्टी घोषित करण्यात आली आहे.

शहरातील नागरिकांनी विषेशत: नदीपात्राशेजारील नागरिकांनी सतर्क रहावे, तसेच नदीकडे पाणी बघण्यासाठी लहान मुलांनी व वृध्दानी येवू नये, कोणत्याही वेळी पाणी पातळीत वाढ होऊ शकते त्यामुळे प्रशासनाच्या सुचनांचे पालन करावे.

सौ स्नेहल सुर्यवंशी, उपनगराध्यक्षा, म्हसवड नगरपरिषद  

Leave A Reply

Your email address will not be published.