रावळपिंडी – पाकिस्तानचे आयसीसी पॅनेल पंच अलीम दार यांनी सर्वाधिक एकदिवसीय सामन्यांत पंचगिरी करण्याचा विक्रम साकार केला. येथे सुरू असलेल्या मालिकेत पाकिस्तान व झिम्बाब्वे यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात पंचगिरी करताना त्यांनी दक्षिण आफ्रिकेचे पंच रुडी कोएर्टझन यांच्या कामगिरीला मागे टाकले.
अलीम दार यांचा हा 210 वा एकदिवसीय सामना ठरला. कोएर्टझन यांच्या नावावर 209 सामने आहेत. सर्वाधिक कसोटी सामन्यांत पंचगिरी करण्याची कामगिरीही त्यांच्याच नावावर नोंदली गेली आहे. त्यांनी आजवर 132 कसोटी सामन्यांत ऑनफिल्ड पंच म्हणून काम पाहिले आहे.
ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड यांच्यात पर्थ मैदानावर गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या कसोटीत त्यांनी वेस्ट इंडिजच्या स्टिव्ह बकनर यांच्या 131 कसोटींच्या कामगिरीला मागे टाकत सर्वाधिक कसोटी सामन्यांत पंचगिरी करण्याची कामगिरी केली.
त्यांनी टी-20 च्या 45 सामन्यांतही पंचगिरी केली असून सर्वाधिक टी-20 सामन्यांत पंचगिरी करण्याची पाकिस्तानच्याच एहसान रझा यांच्या नावावर असून त्यांची कामगिरी मागे टाकण्याचीही अलीम दार यांना संधी आहे. ते गेले 16 वर्षे आयसीसी पॅनेल पंच म्हणून कार्यरत आहेत.