पुणे(प्रतिनिधी) – पुणे शहरात कंटेनमेंट झोन वगळता इतर भागास कडक संचारबंदीतुन शिथिलता मिळताच दारूचे दुकाने उघडण्यापूर्वीच शेकडो तळीरामांनी गर्दी केली होती. तळीरामांच्या रस्त्यावर रांगा लागल्याचे चित्र सकाळपासून पाहायला मिळत होते. मात्र मद्यविक्रेत्यांमध्ये तसेच प्रशासनामध्ये संभ्रम असल्याने दुपारपर्यंत मद्याची दुकाने उघडली गेली नव्हती. दुपारी उत्पादनशुल्क विभाग आणी जिल्हाधिकाऱ्यांची बैठक झाली. यानंतर मद्याची दुकाने काही अटी व शर्थीनुसार उघडी करण्यास परवानगी देण्यात आल्याचे परिपत्रक काढण्यात आले. मद्यविक्रेत्यांनी आवश्यकता भासल्यास त्यांनी जिल्हा प्रशासनास आवश्यक पोलीस बंदोबस्त उपलब्ध करुन देण्याची विनंती करावी असेही आदेशात म्हटले आहे.
शहरातल मध्यवर्ती भागात कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाऊन आहे, मात्र, सिंहगड रोड, कोथरूड, वारजे, औंध, बालेवाडी आदीभागात सोमवारपासून शिथीलता आणली आहे. दारूचे दुकाने उघडणार असल्याचे समजताच सकाळी साडे आठ नऊ वाजल्यापासून वाईन शॉप समोर मद्य प्रेमींनी गर्दी केली होती. यामुळे सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला होता. मात्र मद्य दुकानदारांमध्ये दुकाने उघडण्यासंदर्भात संभ्रम होता. यामुळे दुकाने उघडली न गेल्याने मद्यप्रेमिंना माघारी फिरावे लागले. तर काही ठिकाणी मद्यप्रेमी दुकाने उघडण्याची वाट बघत तासनतास उभे होते.
दरम्यान जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दुपारी परिसपत्रक काढल्यावर संभ्रम दुर झाला. या परिपत्रकानुसार शहरातील कंटेनमेंट झोन वगळता इतर क्षेत्रातील घाऊक मद् विक्रेत्यांचे व्यवहार चालु करण्यात येतील. पण हे व्यवहार सायंकाळी पाच वाजल्यापर्यंतच सुरु ठेवता येणार आहेत. यामध्ये नगरपरिषदसह शहरी भागातील मॉल्स, बाजार संकुलातील दुकाने चालू करणा येणार नाहीत. तसेच किरकोळ मद्यविक्रीची दुकाने सीलबंद मद्यविकीसाठी सकाळी दहा ते सायंकाळी सहा पर्यंतच खुली ठेवता येणार आहेत.
मद्य विक्रेत्यांसाठी नियम व अटी…
* एकाच वेळी दुकानासमोर पाच पेक्षा जास्त व्यक्ती असू नयेत
* सोशल डिस्टंसिंग व मास्कचा वापर अनिवार्य
* सर्व ग्राहकांचे थर्मल स्कॅनिंग तसेच सर्दी, खोकला, ताप लक्षणे आढळल्यास व्यक्तींना दुकानात प्रवेश देता येणार नाही
* दुकानात मद्य प्राशन करता येणार नाही
* परिसरात थुंकण्यास सक्त मनाई
* दुकानदार/ग्राहकाकडून नियमभंग झाल्यास कडक कारवाई करण्यात येईल