जिल्ह्यातील मद्यविक्री दुकाने तीन दिवस बंद राहणार

जिल्ह्यातील बारा मतदारसंघात 21 ऑक्‍टोबर रोजी मतदान होत असून मतदान आणि मतमोजणीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील सर्व प्रकारची मद्यविक्री दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत. या आदेशानुसार दि. 19 ऑक्‍टोबर रोजीच्या सायंकाळी 6 वाजेपासून ते दिनांक 20 व 21 ऑक्‍टोबर रोजी संपूर्ण दिवस ही दुकाने बंद राहतील.

मतमोजणीच्या दिवशीही (24 ऑक्‍टोबर) रोजीही संपूर्ण दिवस मद्यविक्री दुकाने बंद राहतील.
लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, 1951 च्या कलम (135 सी) अन्वये आणि महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये प्राप्त अधिकारानुसार जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार हे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार मतदानाच्या दोन दिवस अगोदर, मतदानाचा दिवस आणि मतमोजणीच्या दिवशी जिल्ह्यातील सर्व प्रकारची देशी विदेशी मद्य विक्री दुकाने, परवानाकक्ष, अनुज्ञप्ती, एफएल , बीआर-2 अनुज्ञप्त्या, ताडी विक्री दुकाने बंद राहतील.

जिल्ह्यातील संबंधित क्षेत्रातील निरीक्षक व दुय्यम निरीक्षक, भरारी पथक यांनी या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी होईल, यादृष्टीने कार्यवाही करावी, असे श्री. द्विवेदी यांनी बजावले असून आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांविरुद्ध कडक कार्यवाही करण्यात येईल आणि त्या कायमस्वरुपी बंद करण्याची कार्यवाही करण्यात येईल, असेही या आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. मतदानासाठी दोन दिवस तर मतमोजणीसाठी एक दिवस मद्याची दुकाने बंद राहणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.