पसरणी घाट बनतोय मद्यपींचा अड्डा

धनंजय घोडके
घाटात कचऱ्याचे साम्राज्य; स्वच्छता अभियानाला हरताळ

वाई  – देशभरात स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी शासनाने ग्रामपंचायतींपासून महापालिकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे. स्वच्छतेविषयी नागरिकांमध्ये जागृती होत असतानाच काही अपप्रवृत्तींमुळे या अभियानाला खो बसत आहे.

संवेदनशील ठिकाणी राजरोस कचरा टाकला जात आहे. नागरिक व पर्यटक स्वच्छता अभियानाला हरताळ फासत असल्याचे चित्र वाई-पाचगणी रस्त्यावरील पसरणी घाटात दिसत आहे. त्याचबरोबर हा घाट मद्यपींचा अड्डा बनत आहे. पसरणी घाटात रस्त्याच्या दुतर्फा घनदाट झाडी आहे. ही हिरवाई पर्यटक व स्थनिकांना भुरळ पाडत असते. हा परिसर विविध प्राणी, पक्ष्यांचा अधिवास आहे. निसर्गसंपन्न पसरणी घाटाच्या प्रारंभापासून असलेल्या झाडाझुडपांच्या आडोशाला बसून शेकडो मद्यपी राजरोस मद्यपान करून प्लॅस्टिकच्या पिशव्या, ग्लास, बाटल्या व अन्नपदार्थ अस्ताव्यस्त टाकून देत आहेत.

पाचगणी, महाबळेश्‍वरला जाण्यासाठी पसरणी घाट हा मुख्य रस्ता असल्याने या घाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. वाई शहरातील असंख्य नागरिक या घाटात सकाळी व सायंकाळी फिरायला जातात. घाटात मद्यपी दारूच्या रिकाम्या बाटल्या तेथेच टाकून देत किंवा फोडत असल्याने अनेक ठिकाणी काचांचा खच पडत आहे. घाटात फिरायला जाणारे लोक घाटात स्वच्छता करण्यासाठी रिकाम्या बाटल्या व काचा गोळा करतात. मात्र, घाटात कचराकुंड्या नसल्याने गोळा केलेल्या बाटल्या, काचा ठेवायच्या कुठे, असा प्रश्‍न पडतो. त्यामुळे घाटात मुख्य ठिकाणी कचराकुंड्यांची व्यवस्था करावी. पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या प्रवृत्तींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून होत आहे.

पसरणी घाटात पर्यावरणाचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. शासकीय पातळीवर स्वच्छता अभियान व पर्यावण संवर्धनासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत; परंतु काही अपप्रवृत्तींना याचे भान नाही. काही लोक कोठेही कचरा करतात. मद्यपी राजरोस दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी कचरा करतात. संबंधित विभागांनी भरारी पथके नेमून अशा लोकांवर कडक कारवाई केली पाहिजे.

प्रशांत डोंगरे, वृक्षसंवर्धन ग्रुप, वाई.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.