कोटा येथील शेतकऱ्याची किमया ! आता वर्षभर खायला मिळणार आमरस

नवी दिल्ली  – राजस्थानातील कोटा येथील श्रीकिशन सुमन या शेतकऱ्याने वर्षभर फळ देणारे आंब्याचे अभिनव असे वाण विकसित केले आहे, सदाबहार असे त्याचे नाव आहे. हे वाण आंबा पिकावर येणाऱ्या बहुतांश विकारांचा प्रतिकार करते. हे फळ चवीला लंगडा या आंब्याच्या तुलनेत गोड असून याचे झाड ही नेहमीपेक्षा आकाराने खूपच लहान असल्याने परसबागेत, उच्च घनतेच्या बागेसाठी उपयुक्त आहे. शिवाय ते काही वर्षे कुंडीतही वाढवता येते. याव्यतिरिक्त, फळाचा गर गडद नारिंगी असून चवीला गोड आहे आणि लगद्यामध्ये फायबरचे प्रमाण कमी असल्यामुळे ते इतर जातींपेक्षा वेगळे आहे.

गरीबीत जगत असलेल्या श्रीकिशन यांना फलोत्पादन आणि फळबागा व्यवस्थापनात रुची होती. तर गहू आणि भातपिकवण्यावर व्यवसायाने माळी असलेल्या त्यांच्या कुटुंबाचा भर होता. त्यांनी कुटूंबाचे उत्पन्न वाढवण्यासाठी फुलांची लागवड केली. 2000 साली त्यांना आपल्या बागेत एक आंब्याचे झाड वाढलेले दिसले, हे झाड वर्षभर फुलल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी त्यापासून पाच कलम तयार केले आणि त्यापासून हे वाण विकसित केले. हे करण्यास त्यांना सुमारे 15 वर्षे लागली. कलम केलेल्या झाडांनी दुसऱ्या वर्षापासून फळ देण्यास सुरुवात केली असे त्याच्या लक्षात आले.

“नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन’ ,या केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या स्वायत्त संस्थेने या आंब्याच्या जातीचे नाविन्यपूर्ण गुणधर्म पडताळून पाहिले आहेत. एनआयएफने आयसीएआर – भारतीय फलोत्पादन संशोधन संस्था (आयआयएचआर), बंगळुरू आणि एसकेएन कृषी विद्यापीठ, जॉबनेर (जयपूर), राजस्थान येथे चाचणी घेऊन त्याचे मूल्यांकन केले. प्रोटेक्‍शन ऑफ प्लांट वेरायटी अँड फार्मर्स राईट ऍक्‍ट आणि आयसीएआर-नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्सेस (एनबीपीजीआर), नवी दिल्ली अंतर्गत याची नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे.

नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनातील मुगल गार्डनमध्ये नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशनने “सदाबहार’ आंब्याचे झाड लावण्यात मदत केली आहे. या सदाहरित वाणाच्या विकासासाठी, श्रीकिशन सुमन यांना “एनआयएफ’चा 9 व्या राष्ट्रीय संशोधन आणि पारंपारिक ज्ञान पुरस्काराने गौरवण्यात आले आणि त्यानंतर इतर विविध मंचांवर त्यांना मान्यता मिळाली. श्रीकिशन सुमन यांना सन 2017- 2020 दरम्यान देशातून आणि परदेशातून सदाबहार आंब्याच्या 8000 हून अधिक ऑर्डर प्राप्त झाल्या. त्यांनी विविध राज्यातील शेतकऱ्यांना या आंब्याची 6,000 हून अधिक रोपे पुरवली आहेत.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.