वाईत पारंपरिक वाद्यांचा गजर

वाई – गतवर्षीप्रमाणे यंदाही डॉल्बी न वाजविण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते. त्यामुळे उत्सवाच्या पहिल्या दिवसापासून वाई तालुक्‍यासह शहरात डॉल्बीला फाटा देत मंडळांनी गणेशोत्सव साजरा केला. गुरुवारी अनंत चतुर्दशीला वाई शहरातून काढण्यात आलेल्या विसर्जन मिरवणुकीतही पारंपरिक वाद्यांचाचा गजर घुमत होता.

डॉल्बीला पूर्णपणे विश्रांती देत पारंपरिक वाद्यांचा गजर, कोकणी वाद्यांचा खणखणाट, ढोल ताशांचा कडकडाट, फटाक्‍यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत वाई शहरातील व तालुक्‍यातील गणेशोत्सव शांततेत व भावपूर्ण वातावरणात पार पडला. प्रथेनुसार शाहीर चौकातून निघणारी विसर्जन मिरवणूक उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके व प्रांताधिकारी संगीता राजापूरकर यांनी केलेल्या श्रींच्या पुजनाने, नगराध्यक्षा डॉ. सौ. प्रतिभा शिंदे यांच्या हस्ते आरती, पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या हस्ते पुष्पवृष्टी, प्रांतांच्या हस्ते फीत कापून तर मुख्याधिकारी सौ. विद्या पोळ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून सुरु झाली. प्रताप मंडळ गंगापुरी यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमास नगरसेवक प्रदीप चोरगे, भारत खामकर, राजेश गुरव, नगरसेविका, सौ. रुपाली वनारसे, सौ. शितल शिंदे, अशोक मलटणे, अजित शिंदे, अशोकराव सरकाळे आदींसह सामाजिक व राजकीय कायकर्ते उपस्थित होते.

गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या घोषणांनी आसमंत दणाणून गेला. मानाच्या गणपतीचे सायंकाळी 6.15 वाजता प्रस्थान केले. शाहीर चौकातून सुरू होणाऱ्यामिरवणुकांमध्ये मानाच्या गणपती पाठीमागे यावेळी एकही मंडळ नसल्याने शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. तर रविवार पेठेतून निघालेल्या मंडळानी स्वतंत्र मिरवणुका काढल्या. किरकोळ वादावादीचे प्रकार वगळता मिरवणूक शांततेत पार पडली. शाहीर चौक – महात्मा फुले मंडई – दातार हॉस्पिटल कॉर्नर – किसनवीर चौक असा मिरवणूक मार्ग होता.

मानाच्या गणपतीचे विसर्जन रात्री एकच्या दरम्यान करण्यात आले. इतर मंडळांच्या गणपतीचे विसर्जन आपापल्या सोयीनुसार करण्यात आले. या मिरवणुकीत ब्राह्मणशाही गणेशोत्सव मंडळाचा मानाचा गणपती सामील झाला होता. पारंपरिक पध्दतीने पालखीतून श्रींची मिरवणूक काढली होती. याशिवाय दाणेबाजार तरूण मंडळ, सिध्देश्‍वेर युवक मंडळ, तिरंगा गणेशोत्सव मंडळ, गंगापुरी युवक मंडळ, शाहीर चौक गणेश मंडळ, न्यू प्रताप मंडळ, भैरव प्रसाद मंडळ, अखिल भाजी मंडई गणेशोत्सव मंडळ, न्यू आझाद गणेशोत्सव मंडळ, काशिकापडी गणेशोत्सव मंडळ, शेवटचा मानाचा गणपती व्दारका गणेश मंडळ, बाल गणेश मंडळ नावेचीवाडी, न्यू गणेश मंडळ नावेचीवाडी आदींनी मिरवणुकीत सहभाग घेतला होता.

रविवारपेठ विभागातील मंडळांची विसर्जन मिरवणूक रामडोहआळीच्या रथापासून सुरू झाली. या मिरवणुकीत रविवारपेठेतील 14 गणेशोत्सव मंडळे सामील झाली होती. रामडोह आळी ते किसन वीर चौक, स्टेट बॅंक रस्ता, हुतात्मा स्मारक चौक, भाजी मंडई, दातार दवाखाना ते चावडीकडे असा मिरवणुक मार्ग होता. त्यात रामडोह आळी गणेशोत्सव मंडळ, लोकमान्य गणेशोत्सव मंडळ, यंग रविवार गणेशोत्सव मंडळ, नवजवान गणेशोत्सव मंडळ, अजिंक्‍य गणेशोत्सव मंडळ, बाल सुवर्ण गणेशोत्सव मंडळ, हनुमान गणेशोत्सव मंडळ, अजित गणेशोत्सव मंडळ, शिवस्मृती गणेशोत्सव मंडळ, अचानक गणेशोत्सव मंडळ, शेषशाही गणेशोत्सव मंडळ, रविवार गणेशोत्सव मंडळ, भोईराज गणेशोत्सव मंडळ,बाल विकास मंडळ फुलेनगर यांचा समावेश होता.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here