अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र

– डॉ. विनोद गोरवाडकर 

ज्ञानेश्‍वरी अमृतानुभव, चांगदेवपासष्टी यासारखे अमौलिक ग्रंथ सिद्ध करून वारकरी सांप्रदायाचा पाया रचून निश्‍चिंत स्वरूपाचा “आकार-उकार’ संप्रदायाभोवती लिहून ज्ञानराज एकविसाव्या वर्षी साऱ्यांना सोडून सगळे मायापाश झुगारून पलीकडच्या तीराकडे झेपावले. हे सारे कार्यकर्तृत्व डोळे दीपविणारे असल्याने आपोआपच ज्ञानदेवांची कर्मभूमी “आळंदी’ या क्षेत्राला वारकरी सांप्रदायात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे किंबहुना पंढरपुराएवढेच आळंदीला महत्त्व दिले जाते.

“माहेर पंढरी’ एवढी जरी पंढरपूरची ओळख करून दिली तरी पुरेशी व्हावी, कारण माहेरामधले सुख दुसरीकडे कुठे शोधूनही सापडणार नाही. म्हणूनच विठ्ठलाला माऊली म्हटले जाते. पुरुष असूनही स्त्रीलिंगी उच्चार करण्यापाठीशी असणारा वात्सल्याचा अपरंपार भाव शब्दातीत आहे. मातेचे वात्सल्य आणि प्रेम विठुरायाच्या व्यक्तित्त्वात प्रत्येक वारकऱ्याला जाणवले आणि विठ्ठलाची “विठुमाऊली’ झाली. हाच भाग ज्ञानदेवांच्या बाबतीत झाला. अल्पावधीत आभाळाएवढे कार्य करून हा दैवी पुरुष संजीवन समाधीसारखा अतिशय धैर्यशील मार्ग आपल्या ध्येयाकडे मार्गस्थ होण्यासाठी स्वीकारतो ही बाब असमान्य आहे.

इंद्रायणीच्या काठी असलेले पुण्याजवळचे हे छोटेसे टुमदार गाव श्रीज्ञानराजांच्या समाधीस्थानामुळे अतिशय पावन झालेले आहे. पंढरीची वारी देवाची तर आळंदीची वारी संतांची मानण्यात येते म्हणून आषाढीला पांढरीची आणि कार्तिकी एकादशीला आळंदीची वारी केली पाहिजे असा वारकरी संप्रदायाचा नियम आहे. संतांनी आळंदीला “अलंकापूर’ म्हणून संबोधले आहे. “अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र। तेथे नांदतो ज्ञानदेव राजा सुपात्र’ ही प्रख्यात ओवी आळंदीचे महात्म्य उद्‌धृत करते. आळंदीला असणारे सिद्धेश्‍वराचे स्थान, हरिहरेंद्र स्वामींच्या मठाच्या जागेत त्यांच्या पूर्वज गुरूंच्या तीन समाध्या, ज्ञानेश्‍वरांच्या समाधीजवळचा अजानवृक्ष ही सारे स्थळे अत्यंत पवित्र मानली जातात.

“धन्य अलंकापूर धन्य सिद्धेश्‍वर। धन्य ते तरुवर पशुपक्षी।।” असे सेनामहाराज म्हणतात. नामदेव, सेनामहाराज, चोखोबा या संतांनी अशाप्रकारे आळंदीचे वर्णन केलेले असले तरी संत एकनाथांच्या काळापासून “आळंदी’ क्षेत्र अधिकाधिक प्रसिद्ध झाल्याचे दिसून येते. ज्ञानदेवांनी एकनाथांना स्वप्नात येऊन दृष्टांत दिल्याचे एकनाथांनी एका अभंगात सांगितले आहे. शिवाजीमहाराज, राजाराम महाराज, श्रीमंत पेशवे, श्रीमंत पेशवे यांनी त्यांच्या त्यांच्या काळात आळंदीची व्यवस्था लावण्याचा प्रयत्न केला. 1750 साली पुरंदरच्या आवेकर देशपांडे यांनी समाधीचा गाभारा, तर 1971 साली पुण्याच्या नंदराम नाईकांनी शिखर बांधल्याचा उल्लेख सापडतो. अजानवृक्षाजवळ भाविक श्री ज्ञानेश्‍वरीचे पारायण करतात. महाद्वाराजवळील पिंपळवृक्षास लोक सोन्याचा पिंपळ म्हणतात. वर्षभरात वेगवेगळ्या कालखंडात भजन-कीर्तन, नामसप्ताहाचे कार्यक्रम होत असतात. एकादशी आणि गुरुवारी आळंदीस भाविकांची मोठी गर्दी असते. आळंदीचे वातावरण अतिशय प्रसन्न, पवित्र आणि आनंददायी वाटत असल्याने लांबून लांबून लोक येतात आणि येथील वेगवेगळ्या धर्मशाळेत, मठांध्ये मुक्‍काम करतात.
इंद्रायणीत स्नान करून भोवतीच्या सर्व स्थानांचे मनोभावे दर्शन घेतात. ज्ञानेश्‍वरांनी चालवलेली भिंत, भक्त पुंडलिकाचे इंद्रायणीकाठी असणारे मंदिर, विश्रांतीवड, विष्णूमंदिर, राममंदिर हा सरा परिसर वारकरी आणि सामान्य भाविकांसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो.

वारकरी संप्रदायाच्या महत्त्वपूर्ण स्थळांमध्ये पंढरपूर आणि आळंदीनंतर पैठण क्षेत्राचे अत्यंत महत्त्व आहे. पैठणचे मूळ नाव प्रतिष्ठान. संस्कृत विद्येचे बलशाली पीठ म्हणून काशीप्रमाणे पैठण प्रसिद्ध होते. पैठण हे महानुभाव पंथाचे अध्वर्यु श्रीचक्रधर स्वामींचे प्रचार केंद्र होते. पैठणच्या भोगनारायण मंदिरात चक्रधरांचा दहा महिने मुक्‍काम होता. नंतरच्या काळात ज्ञानदेवादि भावंडांचे पैठणला आगमन झाले. उपनयनाचा अधिकार मिळविण्यासाठी आलेल्या या भावडांचा येथील धर्ममार्तंडांनी अपमान केला. याच धर्मसभेत रेड्यामुखी वेद वदविण्याची चमत्कारासदृश कथा सगळ्यांना ठाऊक आहे. भक्तश्रेष्ठ भानुदासांचा जन्म पैठणचाच आणि त्यांच्याच कुळात एकनाथ महाराज जन्माला आले. मधल्या काळात पैठणचे कमी झालेले महात्म्य एकनाथांच्या काळात वाढले आणि एक महत्त्वपूर्ण भक्तिपीठ म्हणून पैठण प्रसिद्ध पावले. अनेक सत्‌पुरुषांची समाधीस्थळे, मोइजुद्दीन या इस्लाम प्रचारकाची कबर, नाथांचे समाधीमंदिर, श्रीखंड्याने पाणी भरलेला रांजण, नाथांचा सभामंडप यासह अनेक महत्त्वपूर्ण स्थळे पैठणास आहे. पैठणचीही वारी वारकरी पंथात अत्यंत भक्‍तिभावाने केली जाते.

Leave A Reply

Your email address will not be published.