Alandi News – ओळख श्री ज्ञानेश्वरीची हा उपक्रम प्रत्येक शाळेत राबविला जावा, जेणेकरून विद्यार्थ्यांमधील दोष-दुर्गुण दूर होतील. ज्ञानेश्वरीतील अभ्यासपूर्ण विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणार्या सर्व घटकांचे कार्य कौतुकास्पद असून, हे कार्य अखंड सुरू ठेवण्यासाठी आळंदी देवसंस्थान सदैव बांधील राहील, असे आश्वासन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे यांनी दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त हभप योगी निरंजननाथ हे होते. प्रमुख उपस्थितीत संस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील, श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, खजिनदार डॉ. दीपक पाटील, श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे, विद्यालयाचे प्राचार्य किसन राठोड, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप काळे यांच्यासह विविध शाळा-संस्थांचे पदाधिकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालक, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.श्री ज्ञानेश्वर विद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ओळख श्री ज्ञानेश्वरीची या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची सांगता मोठ्या उत्साहात, भक्तीमय व प्रेरणादायी वातावरणात पार पडली. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत राज्यभरातून आलेल्या स्पर्धक विद्यार्थ्यांनी ज्ञानेश्वरीतील तत्त्वज्ञान, मूल्यशिक्षण व त्याचा जीवनावर होणारा सकारात्मक परिणाम याचा सखोल व प्रभावी उलगडा आपल्या वक्तृत्वातून केला. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाने उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले. या स्पर्धेत सहभागी झालेल्या 23 विजेत्या विद्यार्थ्यांना आकर्षक स्मृतिचिन्हे, प्रमाणपत्रे व रोख पारितोषिके देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. आळंदी तसेच वारकरी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष विलास महाराज बालवडकर यांच्या वतीने प्रथम पाच विद्यार्थ्यांना प्रत्येकी 1,000 रुपये, तर स्वकाम सेवा संघाचे संस्थापक सारंग जोशी यांच्या वतीने प्रथम तीन विद्यार्थ्यांना प्रत्येकी 500 रुपये रोख पारितोषिक देण्यात आले.यानंतर ओळख श्री ज्ञानेश्वरीची पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. माऊलींच्या कृपा-आशीर्वादाने व सर्वांच्या सहकार्याने हे रोपटे आज वटवृक्ष झाले असल्याचा आनंद यावेळी व्यक्त करण्यात आला. अशा उपक्रमांमुळे तरुण पिढीच्या विचारविश्वाचा सर्वांगीण विकास होतो, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.यावेळी बोलताना सुभाष महाराज गेठे यांनी विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वामुळे अंगावर शहारे उभे राहिल्याची भावना व्यक्त केली. या उपक्रमातील विद्यार्थी हे समाजाचे आरसे असून त्यांना घडविण्याचे काम सर्वांनी मिळून करावे, तसेच समाजातील धनाढ्य व्यक्तींनी हा उपक्रम जगभर पोहोचविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात योगी निरंजननाथ महाराज यांनी ज्ञानेश्वरीचे विचार आजच्या समाजासाठी किती मार्गदर्शक आहेत, यावर प्रकाश टाकला. अंधारातून प्रकाशाकडे नेणारा तेजोमय सूर्य म्हणजे ‘ओळख श्री ज्ञानेश्वरीची’ हा उपक्रम आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वातून आयोजकांचा उद्देश सफल झाल्याचे समाधानही त्यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाच्या शेवटी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.