Alandi News – वडमुखवाडी येथील श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता अत्यंत उत्साहात आणि हरिनाम गजरात करण्यात आली. कीर्तनकार गोविंद महाराज गोरे यांच्या सुश्राव्य काल्याच्या कीर्तनाने या सोहळ्याची समाप्ती झाली. सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण परिसरात भक्तीचा उत्साह संचारला होता.सप्ताहाच्या दरम्यान श्रीज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या विश्वस्त ॲड. रोहिणी पवार यांनी मंदिराला भेट दिली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर यांच्या हस्ते त्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. तसेच कीर्तनकार गोविंद महाराज गोरे यांचा सत्कार पै. किसनबाबा लांडगे यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी पिंपरी चिंचवडचे नवनिर्वाचित नगरसेवक नितीन काळजे, नगरसेवक सचिन तापकीर आणि उदय गायकवाड यांचाही फेटा व उपरणे देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास खजिनदार दत्तात्रय गायकवाड, मृदंगाचार्य व्यंकटेश फड, विठ्ठल आबा गव्हाणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.या हरिनाम सप्ताहामध्ये श्रींची महापूजा, काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायण, श्रीगाथा पारायण आणि महिला भजनी मंडळाची भजने अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ग्रंथ दिंडी मिरवणुकीत महिलांनी डोक्यावर ज्ञानेश्वरी ग्रंथ आणि वैभवी तुळस घेऊन सहभाग नोंदवला, ज्यामुळे मिरवणुकीची शोभा अधिकच वाढली. कीर्तन सेवा आणि ग्रंथ दिंडीनंतर उपस्थित सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या सोहळ्यासाठी वडमुखवाडी आणि परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी व कीर्तनासाठी मोठी गर्दी केली होती.