आळंदी – शाळेतून घरी जात असताना दुचाकीला डंपरची धडक बसून भीषण अपघात झाला आहे. ही घटना आळंदी-वडगाव रोडवर चाळीस फुटी रोडजवळील गोशाळेजवळ सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात तनिषा विशाल थोरवे (वय 4 वर्ष, रा. थोरवे वस्ती, चऱ्होली खुर्द) या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी किसन थोरवे यांनी आळंदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार डंपर चालक संतोष जामिरूद्दीन माल याच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किसन थोरवे हे त्यांची नात तनिषाला शाळेतून घरी घेऊन जात होते. यावेळी आळंदी-वडगाव रोडवर गोशाळेजवळ ट्रकने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात चिमुकलीचा मृत्यू झाला असून किसन थोरवे जखमी झाले. त्यांच्यावर आळंदी येथील केके रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी अधिक तपास आळंदी पोलीस करत आहेत.
दरम्यान, याआधी सोमवारी (ता. 18) सायंकाळी पाचच्या सुमारास वडगाव चौक येथे अमित विठ्ठलराव देशमुख (वय 19) या वारकरी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याचा डंपरखाली चिरडून मृत्यू झाला होता. आळंदी शहर परिसरात मोठ्या प्रमाणात खासगी कंपन्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जड वाहतूक सुरु असते. वाहतुकीचा वेग कमी करण्यासाठी शहरातील प्रमुख चौकांमध्ये आणि आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक बसविण्याची नागरिकांकडून वेळोवेळी मागणी होत आहे. मात्र, आळंदी प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.