आळंदी – आळंदीमध्ये ज्ञानमंदिरा करिता जागा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत, याची खंत आहे. जागा मोठ्या असाव्यात. संस्था चालविताना दातृत्वावर चालावाव्या लागतात. वडगांवकर परिवाराने ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांच्याकडून दान, देणगी मिळवून घेण्याचा प्रयत्न करून भलीमोठी इमारत उभी केली. अलीकडे शिक्षणसंस्था चालविणे फार जिकिरीचे झाले आहे, असे मत आमदार दिलीप मोहिते यांनी व्यक्त केले.
श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचा पंचक्रोशीत झालेला विकास, गुणवत्ता, येथील भौतिक सुविधा यामुळे वाढलेली विद्यार्थी संख्या लक्षात घेता उद्योजक दीपचंदजी ओसवाल व परिवारे यांच्या सहकार्यातून श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत डॉ. नारायण महाराज जाधव यांच्या अध्यक्षतेखाली, आमदार मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत, ओसवाल यांच्या हस्ते शालेय इमारतीच्या भूमिपूजनाचा व कोनशिलेचे अनावरण कार्यक्रम आळंदीत झाला यावेळीआमदार मोहिते बोलत होते.
याप्रसंगी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, उपनगराध्यक्ष सागर बोरुंदिया, संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगांवकर, सचिव अजित वडगांवकर, खजिनदार डॉ. दीपक पाटील, विश्वस्त लक्ष्मणराव घुंडरे, प्रकाश काळे, विद्यालयाचे प्राचार्य दीपक मुंगसे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप काळे, विद्यालयाचे उपप्राचार्य, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.
सचिव अजित वडगांवकर यांनी प्रास्ताविक केले. मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. दिपचंदजी ओसवाल यांनी शाळेची गरज लक्षात घेता शाळेला इमारत बांधून देण्याचे कबूल केले व शालेय इमारतीचे भुमिपूजन झाले असे जाहीर केले तसेच यापुढेही लागेल तसे सहकार्य करू असे सांगून शुभेच्छा दिल्या.