आळंदीने घेतला मोकळा श्‍वास

पालखी सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर अतिक्रमण हटाव मोहीम सुरू

आळंदी – संत श्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज यांचा पालखी सोहळा अंलकापुरीतून पंढरपूरकडे मंगळवारी (दि. 25) प्रस्थान ठेवणार आहे. मात्र, आळंदीत सध्या अतिक्रमणांना पेव फुटल्याने रस्ते अरुंद झाले, तर पदपथ चालण्यासाठी आहे की पथारीधारकांसाठी आहे, असा प्रश्‍न पडला होता. पालखी सोहळा अवघ्या काही दिवसांवर असल्याने लाखो भाविक आळंदीत येणार असल्याने त्यांना या अतिक्रमणांमुळे अडथळा होवू नये म्हणून नगरपरिषदेच्या अतिक्रमण विभागाकडून सोमवार (दि. 3) पासून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली आहे.

यंदाच्या आषाढी वारीत भाविकांना आळंदीत कोणत्याप्रकरच्या अडचणी येऊ नये म्हणून पालखी प्रस्थान सोहळा पूर्वीच शहरातील अतिक्रमण काढण्यात येत असून ही मोहीम आणखी तीव्र स्वरुपात राबविण्यात येणार असल्याचे कर संकलन अधिकारी तथा अतिक्रमण अधिकारी राम खरात यांनी सांगितले. आळंदीत सोमवार (दि. 3) पासून अतिक्रमण मोहीम राबविण्यास आळंदी पालिकेने सुरुवात केली असून ही मोहीम गुरुवार (दि. 20) पर्यंत सुरूच राहणार आहे. पदपथावर ठेवण्यात आलेले लोखंडी बोर्ड इतर छोट्या-मोठ्या वस्तू, विक्री भंडार, तसेच इतर जे काही साहित्य दिसेल त्या विक्रेत्यांवर किंवा संबंधित दुकानदारावर दंडात्मक कारवाई करून साहित्य जप्त करण्यात येईल. या मोहीमेत पालिकेचे कर्मचारी अशोक राजगुरू, नितीन पाटील, खंडु चव्हाण, विशाल भोसले, सागर भोसले, वसुली विभागातील कर्मचारी यांनी राम खरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहभाग घेतला. कोणी विक्रेता प्लॅस्टिक पिशवीचा वापर करीत असेल तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. सोमवारी (दि. 3) झालेल्या कारवाईत पाच हजार रुपयांच्या कॅरीबॅग जप्त करून दोन हजार रुपये, तर मंगळवारी (दि. 4) 500 रुपये असा एकूण दोन दिवसांत 2 हजार 500 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

संपूर्ण प्रदक्षिणा मार्ग, इंद्रायणी घाट, देहू फाटा, आळंदी ग्रामीण रुग्णालय, संपूर्ण माऊली, भैरोबा मंदिर परिसर, भाजीमंडई, बस स्टॉप, मरकळ रस्ता, वडगाव रोड, हजेरी मारुती मंदिर, चाकण चौक आदी परिसरातील सर्व अतिक्रमणे समुळ काढण्यात येणार आहे. त्यामुळे यंदा वारीत पदपथ व रस्ते अतिक्रमण मुक्‍त राहतील त्यामुळे भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही.
– राम खरात, कर संकलन तथा अतिक्रमण अधिकारी, आळंदी

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.