AL Qaeda Terrorist Arested: दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दहशतवादी संघटना अल कायदाच्या मोठ्या दहशतवादी नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे. हे दहशतवादी नेटवर्क झारखंडची राजधानी रांची येथील डॉ. इश्तियाक चालवत होता. हे दहशतवादी राजस्थानच्या भिवडी येथे बसून दिल्लीतील सार्वजनिक ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्याची योजना आखत होते, असे दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे.
भिवडीमध्ये या दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षणही दिले जात होते. एक प्रकारे ते दहशतवाद्यांचे प्रशिक्षण शिबिर म्हणून काम करत होते. दिल्ली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी मोठ्या प्रमाणावर घातपाताची योजना आखत होते. सध्या झारखंड, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये छापेमारी सुरू आहे. बॉम्बस्फोटामागील सूत्रधार डॉ.इश्तियाक अलीची चौकशी सुरू आहे.
झारखंड आणि उत्तर प्रदेशातून आठ जणांना अटक –
दिल्ली पोलिसांनी झारखंड आणि उत्तर प्रदेशमधून आठ जणांना ताब्यात घेतले आहे. यासह अन्य अनेकांना अटक होण्याची शक्यता आहे. झारखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये संशयितांना ताब्यात घेतलेल्या ठिकाणांहून अनेक शस्त्रे, दारूगोळा आणि दहशतवादी साहित्यही जप्त करण्यात आले आहे. रांची, कटक, अलीगढ येथेही काहींना ताब्यात घेण्यात आले आहे. यासोबतच दारूगोळा, आक्षेपार्ह आणि भडकाऊ साहित्य जप्त करण्यात आले आहे.
AK-47 रायफल, बोअर रिव्हॉल्व्हर, जिवंत काडतुसे, डमी इन्सास, एअर रायफल, हँडग्रेनेड, रिमोट कंट्रोल यंत्रणा, यासह इतर काही साहित्य जप्त करण्यात आले आहे.