करोना विषाणूला संपूर्ण जग तोंड देत आहे. देशातही करोनाने थैमान घातले आहे. या विषाणूला लढा देण्यासाठी सरकार, राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. या लढाईत बॉलीवूड कलाकारांनीही वेगवेगळ्या प्रकारे मदत केली आहे. अभिनेता अक्षय कुमारने पीएम केअर्स फंडमध्ये 25 कोटी रुपयांची मदत केली. त्यानंतर खिलाडी कुमारने मुंबई महापालिकेलाही मदत देऊ केली आहे. त्याने बीएमसीला 3 कोटी रुपयांची मदत केली आहे.
करोना विषाणूला हरवण्यासाठी संपूर्ण जग प्रयत्न करत आहे. अशा कठीण प्रसंगी बॉलीवूड सेलिब्रिटीही सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृतीचे काम करत आहेत. तसेच, मोठ्या प्रमाणात आर्थिक मदतही करत आहेत. पीएम केअर्स फंडमध्ये 25 कोटी दिल्यानंतर आता अक्षय कुमारने बीएमसीला 3 कोटीची मदत केली आहे. रिपोर्टनुसार अक्षयने ही मदत आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षित मास्क मिळावा आणि टेस्टिंग किट्ससाठी केली आहे. बीएमसीकडे पीपीई मास्कची कमतरता असल्याची माहिती अक्षय कुमारला मिळाली. त्यानंतर त्याने ही मदत जाहीर केली.